Advertisement

राष्ट्रवादी होणार एनडीएचा नवा भिडू?


राष्ट्रवादी होणार एनडीएचा नवा भिडू?
SHARES

शत्रू नेस्तनाबूत करण्यापलीकडे तुमच्यापेक्षा वरचढ असेल तर त्याला मित्र बनवा. हा नियम राजकारणात अनेक नेत्यांनी आजवर अमलात आणला आहे. भारतीय जनता पार्टी आणि पर्यायाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सपशेल शरणागती पत्करत, त्यांच्याशी मैत्रीचा नवा अध्याय सुरू करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडी(एनडीए)त प्रवेश हे अगदी ताजं उदाहरण. भाजपाशी शत्रुत्व विसरून त्याच पक्षाचा अनुनय करण्याचा आणखी एक प्रयोग लवकरच पहायला मिळू शकतो. देशाच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका निभावणारे नेते शरद पवारयांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लवकरच एनडीएचा घटकपक्ष बनण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका महत्त्वाच्या नेत्याची यासंदर्भात भाजपा पक्षश्रेष्ठींशी चर्चा झाल्याची खात्रीलायक बातमी ‘मुंबई लाइव्ह’ला मिळाली आहे.  


सत्तेचा तोरा आणि मैत्रीचा होरा

स्थानिक, राज्य आणि केंद्र पातळीवर एकछत्री अंमल असल्याच्या थाटात वावरणाऱ्या भाजपा नेत्यांना आणखी एका राजकीय वैऱ्याला नामोहरम करण्याची संधी मिळाली आहे. राजकारणात ठेचकाळणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाशी जुळवून घेण्याची तयारी सुरू केली आहे. खरंतर ही तयारी आधीच सुरू झाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात सर्वाधिक जागा जिंकणारा पण बहुमताच्या आकड्याला स्पर्श न करणारा पक्ष म्हणून भाजपाची नोंद झालेली असताना त्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी न मागता समर्थन देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दर्शवली होती. लोकमताचा मान राखण्यासाठी आणि राज्याला पुन्हा एकदा निवडणुकीच्या दरीत न लोटण्यासाठी हा पाठिंबा देत असल्याचा दावा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केला असला तरी त्या निर्णयामागचं खरं कारण जनतेपासून लपून राहिलं नाही. सर्वच लहानमोठ्या निवडणुकांमध्ये यश मिळवणाऱ्या भाजपाने मात्र राष्ट्रवादीला सुरक्षित अंतरावर ठेवलं. अगदी अलीकडे संयुक्त पुरोगामी दला(युपीए)चा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीने नवी दिल्लीत झालेल्या घटकपक्षांच्या बैठकीला अनुपस्थिती नोंदवली होती. इतकंच नाही, तर राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे आमदार काँग्रेस उमेदवाराला मत देणार नाही, हे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मतदानाच्या आधीच निक्षून सांगितलं होतं.  

1999 ते 2014 अशी सलग 15 वर्ष राज्यात काँग्रेससोबत सत्ता उपभोगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सत्तेच्या बाहेर असल्याचं अस्वस्थपण आजही जाणवतंय. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबई लाइव्हला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे मान्य केलं होतं. शिवाय विरोधी पक्षात असताना तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना जेरीस आणणाऱ्या भाजपा नेत्यांना सत्तासोपान चढल्यानंतर हुरुप येणं साहजिकच होतं. राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठवण्याबरोबरच माजी उप मुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावण्याचं काम सत्ताधारी भाजपानं केलं.


नियम, अटी ठरवण्याचा अधिकार भाजपाकडे

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाय दिवसेंदिवस अधिकाधिक खोलात जात आहे. केंद्र पातळीवरसुद्धा वेगळं चित्र नाही. एनडीएचा घटकपक्ष झाल्यास भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून होणारी चौकशी थांबेल, शिवाय केंद्रात एखादं मंत्रिपद मिळवता येईल असा दूरगामी विचार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने केला नसता तरच नवल. पण इथेच खरी मेख आहे. कधी नव्हे इतकी राजकीय शक्ती बाळगणाऱ्या भाजपाकडे तूर्त तहाचा मसुदा तयार करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादीचं घोडं इथेच पेंड खातंय.

राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने एनडीएत सहभागी होण्याची तयारी दर्शवताना बदल्यात पक्षातर्फे कोणतीही मोठी अट ठेवलेली नाही. एनडीएत प्रवेश करू इच्छिणाऱ्या राष्ट्रवादीचा झुलवत ठेवण्याची नीती भाजपाने अवलंबली आहे. भाजपाने अख्ख्या पक्षाची अवस्था गुजरातचे शंकरसिंह वाघेला आणि महाराष्ट्राचे नारायण राणे या दिग्गज नेत्यांसारखी करून ठेवली आहे. राष्ट्रवादीला एनडीएचा घटकपक्ष म्हणून स्थान देणं किंवा आगामी निवडणुकीत त्यांची दयनीय अवस्था करणं, या दोन पर्यायांवर भाजपाचं विचारमंथन सुरू आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर 2019 निवडणुकांचा ‘रोडमॅप’ मांडताना अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीत  देशात 360 तर महाराष्ट्रातून 48 पैकी 28 जागा स्वबळावर जिंकण्याचं मिशन ठेवलं. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जागांवर लक्ष केंद्रीत करण्याचे आदेश शाह यांनी दिले आहेत. काही वर्षांपूर्वी शरद पवार यांनी निवडणूक लढवून विजय मिळवलेल्या माढा लोकसभा मतदारसंघाचासुद्धा त्यात समावेश आहे.

एकूण रागरंग पाहता राष्ट्रवादीने मैत्रीसाठी हात पुढे केला असलाच तर त्याला प्रतिसाद कसा द्यायचा हे केवळ भाजपालाच ठरवायचं आहे. राष्ट्रवादीला एनडीएत यायचं आहे. पण भाजपाला त्यांना येऊ द्यायचंय का? हा प्रश्न आहे. अर्थात आघाडीची व्याप्ती वाढवून उरल्यासुरल्या विरोधकांमधलं अवसान गाळण्यासाठी राष्ट्रवादीला एनडीएत सहभागी करून घेण्याचा विचार भाजपाकडून होऊ शकतो. प्राप्त परिस्थितीत ही शक्यता खरी असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे नेते 'खाजगी'त देत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वाभाविकपणे या बातमीत तथ्य नसल्याची 'उघड' प्रतिक्रिया देत आहेत.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा