Advertisement

देशातलं पहिलं ISO कार्यालय मुनगंटीवारांचं!


देशातलं पहिलं ISO कार्यालय मुनगंटीवारांचं!
SHARES

राज्याचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मंत्रालयीन कार्यालयाला आय.एस.ओ. मानांकन प्रदान करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. विशेष म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांचे मंत्रालयीन कार्यालय आय एस ओ मानांकन प्राप्त करणारे देशातील पहिले मंत्री कार्यालय ठरले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांच्यासह त्यांच्या कार्यालयीन सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आणि कौतुकही केले. शासनाच्या सर्व विभागांचे आय.एस.ओ मानांकन करून विभागाशी संबंधित सर्व कामकाजाची एक प्रमाणित कार्यपद्धती विकसित केली जाईल. त्यास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांचे कार्यालय मार्गदर्शन करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


वित्तमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेत देशातील पहिले मंत्री कार्यालय आय.एस.ओ. मानांकित केले. सामान्य माणसाच्या हितासाठी त्यांनी गुणवत्तेने काम करण्याची पद्धत यानिमित्ताने स्थापित केली. अर्थमंत्र्यांनी अशा पद्धतीने काम करण्याचा एक उत्तम मार्ग इतरांना दाखवून दिला आहे. यातून प्रशासन अधिक गतिमान आणि लोकाभिमुख होईल आणि शासनाचे वेगळेपण यातून दिसून येईल.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


वनमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर वन विभागाला प्रथमत: 99 आणि नंतर 33 असे एकूण 132 पथदर्शी मुद्दे 5 वर्षांकरिता देण्यात आले. यामध्ये प्रशासकीय सुधारणा या एका मुद्दाच्या अनुषंगाने वन विभागाच्या सर्व कार्यालयांना आय.एस.ओ. मानांकन घेण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. हे उद्दिष्ट क्षेत्रिय कार्यालयापुरते मर्यादित असताना इतरांनाही प्रक्रिया प्रेरणादायी ठरावी म्हणून मंत्री कार्यालय सुद्धा आय.एस.ओ. प्रमाणित करण्याचे ठरविल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्याची, अधिकाऱ्यांची जबाबदारी आणि कामाची कालबद्धता निश्चित झाली असून, सर्व कामांमध्ये पारदर्शकता येईल.

आपल्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तसेच आपल्या कार्यालयाशी संबंध येणाऱ्या प्रत्येक शासकीय विभागाला वित्तमंत्र्यांच्या कार्यालयात होणाऱ्या कामावर, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कामावर प्रतिक्रिया देण्याचा, त्यावर मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना या कार्यप्रणालीमुळे तो मिळेल असेही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.  

शासनाच्या गतिशील, पारदर्शक आणि स्वच्छ प्रतिमेस अनुसरून जनतेच्या वाढत्या अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रशासकीय शिस्त अवलंबणे तसेच शासकीय कामकाजात स्मार्ट संकल्पना आणणे हा या मानांकनासंदर्भातील मूळ उद्देश आहे.

मे 2016 पासून या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी सल्लागार आणि समन्वयकाची  नेमणूक करण्यात आली होती. सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आय एस ओ चे प्रशिक्षण देण्यात आले. कार्यालयीन कामाच्या सर्व प्रक्रियेची यादी तयार करून गुणवत्ता व्यवस्थापन पद्धतीचे निश्चितीकरण करण्यात आले. पायाभूत सुविधांचा आढावा घेवून बैठक व्यवस्था निश्चित करण्यात आली.

ही प्रक्रिया मंत्री कार्यालयात प्रथमच राबविण्यात येत असल्याने प्रमाणित कार्यपद्धती, अधिकारी/कर्मचारीनिहाय सोपविलेल्या जबाबदाऱ्या इत्यादी माहिती एकत्रित करणे आणि आय एस ओसाठी आवश्यक प्रणालीमध्ये  ती संकलित करणे हे मोठे काम मंत्री कार्यालयाने पूर्ण करुन आय एस ओ मानांकन प्राप्त करण्याची कार्यवाही केली आहे.

यामध्ये प्रामुख्याने मंत्री कार्यालयाची कार्यालयीन कार्यपद्धती ओळखून त्यासाठीची प्रमाणित कार्यप्रणाली निश्चित करणे, अधिकारी/कर्मचारी निहाय कर्तव्य आणि जबाबदारी ठरवून त्यांचे अभिलेख तयार करणे, बैठक व्यवस्था, अभ्यागत व्यवस्था, विविध संबधित घटकांकडून अभिप्राय प्राप्त करुन घेणे, अधिकारी आणि कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे,  इत्यादी बाबींचा समावेश आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा