Advertisement

होऊदेच आता 'चाय पे चर्चा'! सीएमओचा चहापानाचा खर्च ३.४ कोटींवर

गल्लीबोळात सुरू असलेल्या भाजपाच्या चहा पार्ट्या आताकुठे थांबून पकोड्यावर आल्या होत्या, त्यातच मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा भाजपाच्या कपातील चहावर जाऊन खिळल्या आहेत.

होऊदेच आता 'चाय पे चर्चा'! सीएमओचा चहापानाचा खर्च ३.४ कोटींवर
SHARES

''एक साधा चहावाला या देशाचा पंतप्रधान'' झाला म्हणत भाजपाने साऱ्या देशभरात 'चाय पे चर्चा' घडवून आणत सत्ता काबिज केली. तेव्हापासून गल्लीबोळात सुरू असलेल्या भाजपाच्या चहा पार्ट्या आताकुठे थांबून पकोड्यावर आल्या होत्या, त्यातच मुख्यमंत्री कार्यालयात चहा घोटाळ्याचा प्रकार उघडकीस आल्याने पुन्हा एकदा सगळ्यांच्या नजरा भाजपाच्या कपातील चहावर जाऊन खिळल्या आहेत.


आरटीआय अंतर्गत माहिती

विधानसभेतील उंदीर घोटाळ्याचं प्रकरण थंड होत नाही, तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील (सीएमओ) गरमागरम चहा घोटाळा उघडकीस आणला आहे, तो मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी. निरूपम यांनी माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मिळवलेल्या आकडेवारीनुसार 'सीएमओ'ने वर्षभरात चहापानावर तब्बल ३.४ कोटी रुपये खर्च केले आहेत.



असा वाढला खर्च

निरूपम यांनी मिळवलेल्या आकडेवारीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील चहापानावर होणाऱ्या खर्चात गेल्या २ वर्षांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील चहापानावर ५८ लाख रुपये खर्च झाले होते. हा खर्च २०१७-१८ मध्ये थेट ३.४ कोटी रुपयांवर गेला आहे. चहापानाच्या खर्चात थोडीथोडकी नव्हे, तर ५७७% इतकी प्रचंड वाढ झाली आहे.

या वाढीचा हिशेब लावायचा झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात रोज १८,५०० कप चहा प्यायला जातो. हे मात्र कुणालाही न पटण्यासारखच आहे. एकीकडे महाराष्ट्रातील शेतकरी रोज आत्महत्या करत असताना, दुसरीकडे चहापानावरील खर्च ५७७ % टक्क्यांनी वाढतो, हे फारच आश्चर्यजनक आहे.


कुठला चहा पितात?

याबद्दल संजय निरुपम म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी कोणत्या प्रकारचा चहा पितात किंवा पाहुण्यांना पाजतात, त्यात असं काय टाकलं जातं? तेच कळत नाही. आजच्या काळात आपण ग्रीन टी, लेमन टी, हर्बल टी अशा वेगवेगळ्या प्रकारचे चहाचे प्रकार ऐकलेले आहेत. मुख्यमंत्री कदाचित सोने घोटवलेला चहा पित असतील किंवा पाजत असतील, असा चिमटा त्यांनी काढला.

भाजपा सरकार एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी चहा विकायचे असे मोठ्या अभिमानाने सांगते. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या चहावरून देश लुटायला बसलेले आहेत.


उंदीर घोटाळा असो किंवा चहा घोटाळा असो, यांत सर्वसामान्य करदात्याची लूट होत आहे. सर्वसामान्यांचा पैसे लुटला जात आहे. यासाठी देशाची आणि महाराष्ट्राची जनता भाजपा सरकारला कधीच माफ करणार नाही.
- संजय निरुपम, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस


निरूपम यांचा निष्कर्ष चुकीचा- सीएमओ

मुख्यमंत्री सचिवालयातील चहापानाच्या खर्चाबाबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी माहिती अधिकाराचा आधार घेत जो निष्कर्ष काढला आहे तो पूर्णत: चुकीचा आहे. हा केवळ चहापानाचा खर्च नसून त्यात चहापान, नाश्ता, जेवण, मंत्रिमंडळ बैठकींसाठी होणारा नाश्ता, सत्कारासाठी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ, भेटवस्तू, सर्व प्रकारच्या आणि विविध विभागांच्या बैठका, शिष्टमंडळासाठीचा खर्च असा संपूर्ण आतिथ्य खर्च समाविष्ट आहे.

अलीकडे मंत्रालय आणि मुख्यमंत्री सचिवालयाला भेट देणाऱ्या अभ्यागतांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय हा खर्च केवळ मुख्यमंत्री सचिवालयाचा नसून त्यात मंत्रालय, सह्याद्री अतिथीगृह, वर्षा निवासस्थान, नागपूर येथील रामगिरी निवासस्थान, हैद्राबाद हाऊस या सर्व ठिकाणचा खर्च समाविष्ट आहे.

यात वर्षनिहाय देयक दिल्याचा आकडा असून ते एकाच वर्षाचे दिले आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळे ५७७ टक्के वाढ हा निष्कर्ष संपूर्णत: चुकीचा आहे.



हेही वाचा-

मंत्रालयात उंदीर घोटाळा झालाच नाही! चंद्रकांत पाटलांचा विधानसभेत दावा

मुंबईतील गुजराती व्यापाऱ्यांना संरक्षण द्या - संजय निरूपम

मनसेशी युती? शक्यच नाही! - संजय निरुपम



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा