Advertisement

एकता बिल्डरला महारेराचा पहिला दणका..घराची रक्कम परत देण्याचे आदेश!


एकता बिल्डरला महारेराचा पहिला दणका..घराची रक्कम परत देण्याचे आदेश!
SHARES

तुम्ही घर घेताना बिल्डरने तुमची जर फसवणूक केली असेल, तर आता तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. कारण आता महारेरा अंतर्गत तुम्हाला न्याय मिळू शकतो. प्रसंगी फसवणाऱ्या बिल्डरला दंड आकारुन तुमची सर्व रक्कम परतही मिळू शकते! कारण घराच्या नावे ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांना दणका देण्यास अखेर महारेराने सुरूवात केली आहे. 

ग्राहकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार बुधवारी पहिली सुनावणी पार पडली असून महारेराचा पहिला दणका एकता बिल्डर्सला बसला आहे. बिल्डरकडून ग्राहकाने घराची रक्कम परत मागितली असतानाही रक्कम परत देण्यास नकार देणाऱ्या या बिल्डरला ही रक्कम परत करण्याचे आदेश दिल्याची माहिती महारेराचे सचिव वसंत प्रभू यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली आहे. तर बिल्डरने ही रक्कम परत देण्याचे कबुल केले आहे. महारेराकडून तक्रारदाराला मिळालेला हा पहिला न्याय असल्याने ही सुनावणी महत्त्वाची मानली जात आहे.

बिल्डरांकडून होणारी ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी 1 मे पासून महारेरा कायदा राज्यात लागू झाला. या कायद्यांतर्गत बिल्डरांची आणि त्यांच्या प्रकल्पांची नोंदणी करुन घेतली जात आहे. तर दुसरीकडे नोंदणीकृत बिल्डर आणि प्रकल्पांविरोधातील तक्रारी ग्राहकांकडून मागवल्या जात आहे. त्यानुसार आतापर्यंत 60 हून अधिक ऑनलाईन तक्रारी महारेराकडे दाखल झाल्या आहेत. या तक्रारींनुसार गेल्या आठवड्यात पहिल्या सुनावणीस सुरुवात झाली असून बुधवारी पहिली सुनावणी पूर्ण झाली.


काय आहे प्रकरण?

एकता पार्क्सव्हिले बिल्डर्स (एकता वर्ल्ड) या नामांकित बिल्डरच्या विरार येथील ब्रुकलेन पार्क या प्रकल्पात कमलेश अलियानी यांनी घर खरेदी केले होते. त्यानुसार 26 लाख 15 हजार 357 इतकी रक्कम अॅडव्हान्स बुकिंग म्हणून भरली होती. तर इतर काही शुल्कही भरले होते. पण बिल्डरकडून वेळेत घराचा ताबा मिळत नसल्याने अलियानी यांनी भरलेली रक्कम परत करण्याची मागणी एकता बिल्डर्सकडे केली होती.

पण ही रक्कम परत देण्यास बिल्डरकडून नकार देण्यात आल्याने अलियानी यांनी महारेराकडे धाव घेतली. त्यानुसार या दोन्ही पक्षाची बाजू ऐकून बिल्डरने रक्कम परत करण्याचे आदेश महारेराकडून देण्यात आले आहे.

महारेराच्या या निर्णयामुळे ग्राहकाला न्याय मिळाला असून, हा बिल्डरसाठी दणका असल्याचे मानले जात आहे. पण दुसरीकडे महारेराच्या अभ्यासकांनी मात्र यावर नाराजी व्यक्त केली आहे.


महारेराच्या कायद्यानुसार बिल्डरविरोधात कडक कारवाई होण्याची, त्याला दंड आकारण्याची गरज होती. जेणेकरुन इतर बिल्डरांना संदेश गेला असता आणि बिल्डर अशी फसवणूक करण्यास धजावले नसते. 

विजय कुंभार, महारेराचे अभ्यासक



हेही वाचा

'महारेरा'ची बिल्डरांवर कृपा कायम, आकारणार अवघा १ लाख रुपये दंड


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा