Advertisement

४० लाखांसाठी लटकली १५० कोटींची मालमत्ता, आढमुठ्या बिल्डरला महरेराचा दणका


४० लाखांसाठी लटकली १५० कोटींची मालमत्ता, आढमुठ्या बिल्डरला महरेराचा दणका
SHARES

महारेराच्या आदेशानुसार तक्रारदाराला ४० लाखांची थकबाकी देण्यास टाळाटाळ करणं एका आढमुठ्या बिल्डरला चांगलंच महागात पडलं आहे. ४० लाख वाचवू पाहणाऱ्या बिल्डरला महारेरानं दणका देत या बिल्डरची चक्क १५० कोटी रुपयांची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. येत्या काही दिवसांत बिल्डरनं ४० लाखांची थकबाकी न दिल्यास या मालमत्तेचा लिलाव करून थकबाकी वसूल करू असंही महारेरानं ठणकावलं आहे.


काय आहे प्रकरण?

प्रज्ञा साबळे यांनी कांबार कन्स्ट्रक्शन समूहाच्या आंबिवली येथील रा. फाक्लो वर्ल्ड प्रकल्पात घर खरेदी केलं. घराची काही टक्के रक्कमही भरली. पण या घराचा ताबा साबळे यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी बिल्डरकडे आपली रक्कम देण्याची मागणी केली. पण ही रक्कम देण्यास बिल्डरने स्पष्ट नकार दिला.


महारेराकडे धाव

बिल्डर घर आणि घराची रक्कमही देत नसल्याने साबळे यांनी थेट महारेराकडे धाव घेत बिल्डरविरोधात तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार बिल्डर दोषी आढळला नि महारेरानं साबळे यांची रक्कम व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. ही रक्कम ४० लाखांच्या घरात होती. पण ही रक्कम देणास बिल्डरने नकार दिला.


'इथं'ही निर्णय बिल्डरविरोधात

यावरच हा बिल्डर थांबला नाही, तर त्याने या आदेशाविरोधात अपिलीय न्यायाधिकरणाकडे धाव घेतली. मात्र इथंही हा बिल्डर हरला नि अपिलीय न्यायाधीकरणानेही त्याला रक्कम परत करण्याचे आदेश दिले. पण या आदेशानंतर ही या बिल्डरने ४०लाखाची रक्कम काही दिली नाही.


'इथ'ली मालमत्ता ताब्यात

बिल्डरचा आढमुठेपणा अखेर बिल्डर ला चांगलाच महागात पडला. कारण महारेराने बिल्डरची जंगम मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महसूल विभागामार्फत नोटीस बजावत नुकतीच आंबिवलीतील बिल्डरची १५० कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली आहे. जोपर्यंत बिल्डर ४० लाखांची रक्कम देत नाही तोपर्यंत ही मालमत्ता महरेराच्या ताब्यात राहणार आहे.

एवढंच नाही, तर बिल्डरने ४० लाखांची रक्कम न दिल्यास १५० कोटींच्या मालमत्तेच्या लिलाव करून त्यातून ही रक्कम वसूल करू, असं महारेरान स्पष्ट केलं आहे हे विशेष.

बिल्डरसाठी हा खूप मोठा दणका मानला जात आहे. महारेराकडून झालेली ही पहिली कारवाई आहे. या कारवाईमुळे सर्वच फसव्या, आढमुठ्या बिल्डरांना चाप बसेल, असं म्हटलं जात आहे.



हेही वाचा-

तुरूंगातून आरोपीला करायचीय बिल्डरविरोधात महारेरात तक्रार

लोअर परळ-एल्फिन्स्टनचा 'भाव' पडणार?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा