Advertisement

कोणीतरी आहे तिथे..?


कोणीतरी आहे तिथे..?
SHARES

आपल्या पलीकडे या विश्वाच्या पसाऱ्यात कोणी आहे का..?

काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'कोई मिल गया' या सिनेमामधला जादू  बहुदा  सगळ्यांना आठवत असेल. एलियन्स खरंच असेच दिसत असतील का? इतकेच चांगल्या स्वभावाचे असतील का? की मग अजून काहीतरी भयानक वास्तव असेल? असे अनेक प्रश्न आपल्या सर्वांनाच पडले असतील. गेल्या कित्येक वर्षांपासून या दिशेने जगभरातले शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. मात्र अजूनही त्यांना त्या एका प्रश्नाचं उत्तर सापडलेलं नाही....खरंच कोणीतरी आहे तिथे?

हा प्रश्न सामान्य माणसापासून ते वैज्ञानिकांपर्यंत सगळ्यांनाच पडला आहे. इतक्या मोठ्या विश्वाच्या पसाऱ्यात आपण एकटेच असू ही शक्यता खूपच कमी आहे. विश्वाचा पसारा इतका प्रचंड आहे की, आपण त्याचं आयुर्मानही ठरवू शकलेलो नाही. मानवनिर्मित हबल टेलिस्कोपने १२.५ बिलियन वर्षांपूर्वीचा प्रकाश आत्तापर्यंत बंदिस्त केला आहे. त्यावरून, सध्या तरी विश्वाचं वय तितकंच आहे असं मानण्यात येतं. इकडे हे लक्षात घेतलं पाहिजे की हा प्रकाश १२.५ बिलियन वर्षांनंतर पृथ्वीवर पोहोचू शकला आहे. त्या पलीकडे काय आहे, हे जाणून घ्यायला कदाचित अजून वेळ लागेल. म्हणूनच या विश्वाच्या पोकळीत अशी अनेक रहस्य दडलेली आहेत ज्याचा मानव अजून शोध घेतो आहे.

आपल्यासारखंच किंवा आपल्यापेक्षा प्रगत असं कोणीतरी आहे तिथे? याचं उत्तर शोधण्यासाठी आजही अनेक वैज्ञानिक अवकाशाचा वेध घेत असतात. युरी मिलनर आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक स्टीफन हॉकिन्स यांनी सुरू केलेल्या ब्रेकथ्रू लिसन या संस्थेने अशाच काही रेडिओ सिग्नल्स, ज्याला एफआरबी असेे म्हटले जाते, त्याचा शोध लावला आहे. एफ.आर.बी म्हणजेच फास्ट रेडिओ बस्ट. यात खूप कमी मिलीसेकंद आयुष्य असलेली रेडिओ प्लस शोधली जाते.



या एफ.आर.बी. कशा निर्माण होतात? त्याचा स्त्रोत काय? याबद्दल प्रचंड गूढ आहे. काही वैज्ञानिकांच्या मते कृष्णविवरांमुळे तर, काहींच्या मते पल्सार ताऱ्यांमुळे तर, काहींच्या मते इ.टी. म्हणजेच एलियन्सद्वारा संदेश पाठवण्यासाठी या एफ.आर.बी. विश्वाच्या अनंत पसाऱ्यात सोडल्या जात आहेत.

आता जी एफ.आर.बी. शोधली आहे, तिचा नंबर आहे एफ.आर.बी. १२११०२. आता याचा अर्थ, ही पल्स पहिल्यांदा १२ नोव्हेंबर २००२ मध्ये शोधली गेली. पण, ही पल्स पुन्हा एकदा २०१५ मध्ये जाणवली होती. त्यानंतर २६ ऑगस्ट २०१७ ला काही तासांच्या विश्लेषणात तब्बल १५ वेळा तिचं पुन्हा अस्तित्व दिसून आलं आणि पूर्ण जगाचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं. 



आत्तापर्यंत एफ.आर.बी. जरी शोधल्या गेल्या असल्या, तरी पुन्हा पुन्हा एकाच ठिकाणाहून जाणवणाऱ्या या एफ.आर.बी. १२११०२ ने संशोधकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही एफ.आर.बी. १२११०२ ड्वार्फ आकाशगंगेतून येत असून पृथ्वीपासून ही आकाशगंगा ३ बिलियन प्रकाशवर्ष दूर आहे.

भारतासाठी आनंदाची बातमी ही की, आत्ताचा हा शोध भारतीय संशोधक डॉक्टर विशाल गज्जर याने लावला आहे. आपल्या पोस्ट डॉक्टरेट रिसर्चचा अभ्यास ग्रीन ब्यांक टेलिस्कोप, वेस्ट व्हर्जिनिया येथे करत असताना डॉक्टर विशालने हा शोध लावला. ४०० टी.बी. इतका प्रचंड डाटा या अभ्यासादरम्यान त्याने गोळा केला आहे. गुजरातमधल्या बोतड या गावी शालेय शिक्षण तर इंजिनिअरिंगचे शिक्षण शहा इंजिनिअरिंग कॉलेज, भावनगर, येथून पूर्ण केलेल्या विशालला डॉक्टरेटसाठी कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश मिळाला. आपल्या प्रोजेक्टसाठी तो ब्रेकथ्रू लिसन या टीमचा सदस्य झाला. आता त्याच्या या शोधामुळे पुन्हा एकदा माणसाच्या पलिकडे कोणीतरी आहे तिथे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.



या शोधामुळे वैज्ञानिक का अचंबित झाले आहेत? ते आपण लक्षात घेतले पाहिजे. एफ.आर.बी. आधीपासून माहीत असल्या तरी एकाच ठिकाणाहून पुन्हा पुन्हा त्या कधीच दिसलेल्या नाहीत. एफ.आर.बी. १२११०२ ही एकमेव अशी रेडिओ प्लस आहे की जी अनेकदा एकाच सोर्सकडून दिसून आली आहे. अशा रेडिओ लहरींसाठी ज्या गोष्टी कारणीभूत असतात, त्या या एफ.आर.बी.च्या बाबतीत दिसत नाहीत. समजा, पल्सारमुळे झाली तर कोणत्याही एक्स रे मिळालेल्या नाहीत किंवा कृष्णविवराचं अस्तित्वही नाही. यामुळेच जी अजून एक शक्यता वर्तवली जाते, ती म्हणजे, एलियन किंवा इ.टी. असण्याची शक्यता. कारण, अशा प्रमाणात एफ.आर.बी. निर्माण होणं सध्यातरी मानवाच्या दृष्टीने गूढ आहे.

कोणीतरी आहे तिथे? हा प्रश्न किंवा कोड अजून न उलगडलेलं आहे. एफ.आर.बी.चं मूळ जोवर शोधलं जात नाही, तोवर त्याचा संबंध हा कोणीतरी असण्याशी जोडला जाणार हे निश्चित आहे. कारण विज्ञान पुरावे मागते. जोवर, त्याचं मूळ सप्रमाण सिद्ध करता येत नाही तोवर आपल्याला भास होत राहणार. एलियन किंवा अशी कोणती व्यवस्था तिथे असली तरी, अंतर बघता पृथ्वीला त्याचा सध्या तरी काही धोका नाही. पण, माणसाच्या कुठेतरी निपचित पडलेल्या प्रश्नाला आता पुन्हा एकदा धुमारे फुटले आहेत हे नक्की. 



एका भारतीयाने पूर्ण जगात संपूर्ण अवकाश संशोधकांचं लक्ष आपल्या नवीन शोधाने एका अनुत्तरीत प्रश्नाकडे वळवलं आहे. जगातील कित्येक टेलिस्कोप आता एफ.आर.बी. १२११०२ वर लक्ष ठेवून असून त्याचा अभ्यास करत आहेत. अशी संधी देणारी ब्रेकथ्रू लिसनची टीम आणि डॉक्टर विशाल गज्जर यांना सलाम व त्यांच्या पुढील संशोधनासाठी शुभेच्छा!

Originally published here - Facebook



हेही वाचा -

नव्या अवकाश क्रांतीचा श्रीगणेशा !


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा