Advertisement

रॅनसमवेअर व्हायरसपासून कसे वाचायचे..? जाणून घेऊया आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोलेंकडून


रॅनसमवेअर व्हायरसपासून कसे वाचायचे..? जाणून घेऊया आयटीतज्ज्ञ अच्युत गोडबोलेंकडून
SHARES

'वॉन्नाक्राय रॅनसमवेअर' या नवीन व्हायरसमुळे सध्या जगभरात भितीचे वातावरण आहे. या व्हायरसमध्ये भारतासहित जगातली सर्व संगणक प्रणाली हॅक करण्याची ताकद आहे.
या व्हायरसच्या हल्ल्याचा फटका आतापर्यंत युरोप, अमेरिका आणि आशियातील अनेक बँकांना बसला आहे. त्यामुळे या व्हायरसच्या हल्ल्यापासून नेमके वाचायचे कसे? याबाबत 'मुंबई लाईव्ह'ने प्रसिद्ध आयटी तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्याशी चर्चा करून उत्तर मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

'वॉन्नाक्राय' नावाचा रॅनसमवेअर व्हायरस नेमका काय आहे ?
-'वॉन्नाक्राय' नावाचा रॅनसमवेअर व्हायरस हा पूर्वीच्या इतर व्हायरसपेक्षा वेगळा आहे. व्हायरस हा एक प्रकारचा प्रोग्राम असतो. अाधीचे व्हायरस क्लिक केल्यास सर्व प्रकारचा डेटा नष्ट करायचे किंवा डेटा चोरायचे. मात्र रॅनसमवेअर व्हायरस डेटा नष्ट करत नाही किंवा डेटाची चोरी करत नाही. तर तो डेटा इनस्क्रिप्ट करतो. डेटा इनस्क्रिप्ट करणे म्हणजे उदाहरण द्यायचे झाले तर कोणताही शब्द उलटा करणे. अंकाच्या बाबतीतही असेच करायचे. आपण वाचण्याचा प्रयत्न जरी केला तरी आपण वाचू शकत नाही, अशी परिस्थिती तयार होते. 'वॉन्नाक्राय' नावाच्या रॅनसमवेअर व्हायरसला संगणकामध्ये एकदा प्रवेश मिळाला, तर तो सर्व डेटा इनस्क्रिप्ट करुन टाकतो

हा व्हायरस पाठवणारा तुमच्याकडून पैसे मागतो. त्यामुळे या व्हायरसला रॅनसमवेअर व्हायरस म्हणतात. पैशांचा मेसेज पाठविल्यानंतर व पैसे दिल्यानंतर हा व्हायरस पाठवणारे एक टूलचे सॉफ्टवेअर पाठवितात आणि व्हायरस डेटा डिस्क्रिप्ट करतात. ज्या प्रकारे लहान मुलांचे अपहरण करतात आणि पैसे मागतात तशाच प्रकारे केले जातात... पैसे दिल्यानंतर डेटा डिस्क्रिप्ट होईलच असे नाही. मात्र रॅनसमवेअर व्हायरस म्हणजे डेटा इनस्क्रिप्ट करणे, पैसे मागणे आणि पैसे दिल्यानंतर डेटा डिस्क्रिप्ट करणे.

कोणत्या प्रकारच्या संगणक प्रणालीला या व्हायरसाचा धोका आहे ?
- 'विंडोज एक्स पी' या संगणक प्रणालीला या रॅनसमवेअर व्हायरसचा सर्वात जास्त धोका आहे. त्यापासून वाचायचे झाल्यास अद्यावत माइक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली सुरु करावी लागेल. माइक्रोसॉफ्टचा दावा आहे की अद्यावत तंत्रामुळे नवीन संगणक प्रणालीला धोका नाही. त्यामुळे बहुतेक सर्वजण माइक्रोसॉफ्टची संगणक प्रणाली अपग्रेड करण्याचे काम करण्यात गुंतले आहेत.

देशातील 'एटीएम' आणि संगणक प्रणालीवर याचा किती परिणाम होणार आहे?
-आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार देशातील 70 टक्के एटीएम 'विंडोज एक्स पी' संगणक प्रणालीवर सुरु आहेत. हा धोका लक्षात घेऊन सध्या एटीएम बंद ठेवले आहेत. कारण या संगणक प्रणालीला अपग्रेड करण्याची गरज आहे. या संगणक हल्ल्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. मात्र काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे देशातील केंद्र सरकार आणि राज्यातील सरकारने धोक्याची सूचना जारी केली आहे.

या रॅनसमवेअर व्हायरसचा संबध अमेरिकेतल्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीशी कसा काय जोडला गेला आहे?
- अमेरिकेतल्या राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने इतर देशांमधील डेटा चोरण्यासाठी याचा वापर केला होता. काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांनी अशा प्रकारच्या सॉफ्टवेअरची चोरी करुन पैसे वसुलीसाठी त्याचा वापर सुरु केल्याचे सांगितले जात आहे. अधिकृतरित्या अजून याबाबत सांगण्यात आलेले नाही.

'वॉन्नाक्राय' रॅनसमवेअर व्हायरसचा त्रास अमेरिकेपेक्षा इतर देशांना झाला आहे का?
- रॅनसमवेअर व्हायरसच्या माध्यमातून पैसे मागण्यासाठी त्यांनी अमेरिकेपेक्षा इतर देशांना लक्ष्य केले असेल. अमेरिकेमध्ये याबाबत संशोधन झालेले आहे. काहींनी रॅनसमवेअर व्हायरसमधील लिंकचा शोध घेऊन तो डिस्क्रिप्ट करण्याचा उपाय शोधला आहे. त्यामुळे अमेरिकेत 'वॉन्नाक्राय' रॅनसमवेअर व्हायरसचे धोके टाळण्यात आले आहेत. मात्र ही माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही.

अशा व्हायरस पाठवणाऱ्यांना पैसे देण्याशिवाय काही वेगळा पर्याय आहे का?
- अँटी व्हायरस सॉफ्टवेअर कंपन्या याबाबत उपाय शोधून काढतील. पण सध्या तुम्हाला ठरवावे लागणार आहे की तुम्ही अशा रॅनसमवेअर व्हायरससाठी पैसे द्यावे की नाही.

सर्वसामान्यांनी कशा प्रकारची खबरदारी घेण्याची गरज का आहे?
- गरज नसेल तेव्हा संगणक सुरु करु नका. संगणक सुरू करायचा असला तरी ओळखीच्या व्यक्तीकडून आलेलाच मेल उघडा. तो बघतानाही काळजी घ्या. कारण कित्येकवेळा व्हायरस ओळखीच्या व्यक्तीकडून मेल आलेला आहे, असा भास निर्माण करतात. मेल उघडल्यानंतर व्हायरस तुमच्या संगणकाच्या डेटावर हल्ला करतो. त्यामुळे शक्य नसेल तर ओळखीच्या व्यक्तीकडून मेल आला आहे का, याची खबरदारी घ्यावी. व्यक्तीकडून आलेल्या मेलचा विषय माहीत असेल तरच मेल उघडावा. अनोळखी व्यक्तीकडून आलेले मेल्स उघडू नका. अँटी व्हायरस अद्यावत वापरावे. 'विंडोज एक्स पी' असेल तर नक्की अद्यावत करावे, अशी सूचना मी नक्की वाचकांना देईल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा