चालाल तर कमवाल, एक किलोमीटर चाला आणि १० रुपये कमवा

'इम्पॅक्ट रन' असं या अॅपचं नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून केवळ चालण्याचीच नाही तर चालता चालता सामाजिक कार्याला हातभार लावण्याची संधीही तुम्हाला मिळाली आहे.

  • चालाल तर कमवाल, एक किलोमीटर चाला आणि १० रुपये कमवा
SHARE

राजेश दररोज ४ किलोमीटर धावतो. अर्थात यामुळे तो निरोगी तर जगतोच आहे. याशिवाय तो दिवसाला ४० रुपये कमवतो. फक्त राजेशच नाही तर त्याचे बाबा देखील दररोज २ ते ३ किलोमीटर चालून २० ते ३० रुपये कमवतात. राजेश आणि त्याच्या बाबांसारखे असे अनेक आहेत जे चालतात आणि निधी संकलीत करतात. एकप्रकारे स्वत:चे आरोग्य राखताना सामाजिक बांधिलकी जपण्याचं मोलाचं कार्य ते करतात. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता. फक्त चालून नाही तर रनिंग आणि सायकलिंग करूनसुद्धा तुम्ही या चांगल्या कार्याला हातभार लावू शकता.


चाला आणि कमवा

ईशान नाडकर्णी, निखिल खंडेलवाल, पीयूष नागले, अंकिता महेश्‍वरी, गौरव मेहरा आणि आकाश नौटियाल या तरूणांनी एक भन्नाट अॅप विकसित केलं आहे. 'इम्पॅक्ट रन' असं या अॅपचं नाव आहे. या अॅपच्या माध्यमातून केवळ चालण्याचीच नाही तर चालता चालता सामाजिक कार्याला हातभार लावण्याची संधीही तुम्हाला मिळाली आहे. काही किलोमीटर चालण्यातून तुम्ही एखाद्या शेतकऱ्याची, गरीब विद्यार्थाची, गरजू रुग्णांची मदत करू शकता. फक्त एवढंच नाही निराधार व्यक्तींना तुम्ही आधार देऊ शकता. यासाठी तुमच्या खिशाला कुठल्याही प्रकारची कात्री लागणार नाही.


असे काम करते अॅप

गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करू शकता. पायी चालताना, धावताना किंवा सायकल चालवताना तुम्ही अॅप सुरू करू शकता. प्रत्येक किलोमीटरमागे चालणाऱ्याच्या नावे दहा रुपये जमा केले जातील. हे पैसे काही निवडक संस्थांना निधी म्हणून दिले जातात. पैसे कोणत्या संस्थेला देण्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही. या अॅपच्याच मदतीनं कोणत्या संस्थेला दान करायचे हे तुम्ही निवडू शकता. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर, आरती इंडस्ट्रीज, केर्न इंडिया, हिरो मोटोकोर्प, वेलस्पन या कंपन्यांनी सीएसआर म्हणजेच कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिब्लिटी फंडातून ही जबाबदारी उचलली आहे.


निधी कुठे दान होतो?

आतापर्यंत ४० लाखांहून अधिक नागरिकांनी या अॅपचा वापर करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. शेतकरी, शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, शाळेतल्या विद्यार्थ्यांना जेवण पुरवण्यासाठी अशा अनेक कारणांसाठी या निधीचा वापर केला जातो. उत्तर काशीतील एका दुर्गम भागात या निधीच्या मदतीतून शाळा सुरू करण्यात आली. जवानांच्या विधवांच्या सबलीकरणाचं काम देखील या निधीतून होते.

तुम्ही देखील या अॅपच्या मदतीनं एखाद्या गरजूची मदत करू शकता. सामाजिक बांधिलकी जपण्यासोबतच तुम्ही आरोग्य देखील निरोगी ठेवू शकता.हेही वाचा -

मराठमोळ्या तरूणाची फोर्ब्स वारी, दुधवाल्याच्या मदतीनं घरगुती सामान तुमच्या दारी

पबजीचं फॅड, भावी पिढीला करतंय मॅड
संबंधित विषय
ताज्या बातम्या