Advertisement

मुंबईकरांनो, आता बोटीने जा कोकणात, मुंबई ते दाभोळ बोटसेवा सुरू


मुंबईकरांनो, आता बोटीने जा कोकणात, मुंबई ते दाभोळ बोटसेवा सुरू
SHARES

गणशोत्सव आणि दिवाळी तोंडावर आली की मुंबईतल्या चाकरमान्याला वेध लागतात ते कोकणात जाण्याचे. मग मिळेल त्या वाहनानं कोकण गाठण्याचा प्रयत्न चाकरमानी करू लागतात. पण कधी ट्रेन हाऊसफुल, तर कधी खासगी वाहनांनी वाढवलेले अव्वाच्या सव्वा दर आणि आता सुरू असलेला एसटीचा संप यामुळे चाकरमान्यांना गाव गाठण्यास अडचण येते. मात्र आता चाकरमान्यांना कोकण गाठण्यासाठी वाहतुकीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. हा पर्याय उपलब्ध करून दिला आहे तो महाराष्ट्र सागरी मंडळाने.

बुधवारपासून, दिवाळीच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई, भाऊचा धक्का ते दिघी आणि दिघी ते दाभोळ अशी बोट सेवा सुरू करत मुंबईकरांसह कोकणवासीयांना दिवाळीची भेट दिली आहे. या बोट सेवेमुळे मुंबई ते दिघी हे अंतर बोटीने केवळ साडे चार तासात, तर दिघी ते दाभोळ हे अंतर साडे पाच तासात पार करता येणार असल्याची माहिती महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल पाटणे यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली.



कोकणात जाण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी सागरी मंडळाकडे होत होती. या मागणीनुसार 'डेल्टा मेरिटाईम कंपनी'च्या माध्यमातून सागरी मंडळाने बुधवारपासून भाऊचा धक्का ते दिघी आणि दिघी ते दाभोळ अशी बोट सेवा सुरू केली आहे. एका छोटेखानी कार्यक्रमात सागरी मंडळाकडून या सेवेचा बुधवारी शुभारंभ करण्यात आला. सकाळी ९ वाजता केपीएएस ही बोट भाऊचा धक्का येथून दिघीसाठी निघाली. या बोटीची क्षमता ३५ प्रवाशांची असून सध्या बोटीचा वेग कमी असला तरी भविष्यात बोटीची क्षमता आणि वेगही वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

दिवाळीत ही बोट सेवा सुरू झाल्याने मुंबईकर आणि कोकणवासीयांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. 




सध्या प्रायोगिक तत्वावर आम्ही ही सेवा सुरू केली आहे. पुढच्या ३ महिन्यात या सेवेला कसा प्रतिसाद मिळतो याची चाचपणी केली जाईल. प्रतिसाद चांगला असेल तर ही सेवा कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येईल. त्याचवेळी बोटीची क्षमता आणि वेग वाढवत बोटीची संख्याही वाढवण्याचा विचार आहे. जेणेकरून मुंबईतून कोकणात आणि कोकणातून मुंबईत येण्यासाठी एक चांगली वाहतूक व्यवस्था निर्माण होईल.

- अतुल पाटणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र सागरी मंडळ



हेही वाचा -

एसटी संपावर, प्रवासी वाऱ्यावर

'एक उपाशी, तर दुसरा खातो तुपाशी', एसटी संपाचा फायदा घेत खासगी वाहनांची दरवाढ


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा