काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या अॅपला विलंब

 Mumbai
काळ्या-पिवळ्या टॅक्सीच्या अॅपला विलंब
Mumbai  -  

राज्यभरात रिक्षा टॅक्सी यांची दरनिश्चिती करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या खटुआ समितीच्या अहवालाला विलंब झाला आहे. त्यामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सीसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अॅपचे उद्घाटनही लांबणीवर पडले आहे.

मुंबईत ओला आणि उबेर टॅक्सीप्रमाणे काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठीही मोबाईल अॅप तयार करण्यात आले आहे. काळी-पिवळी टॅक्सी 'आमची ड्राईव्ह' या अॅपचा येत्या 1 जूनला शुभारंभ करणार होते. मात्र खटुआ समितीचा अहवाल येण्यास विलंब झाला असल्यामुळे 'मुंबई टॅक्सी मेन्स युनियन'ने या मोबाईल अॅपचे उद्घाटन पुढे ढकलले आहे.

ओला उबेरची गारेगार सेवा येण्यापूर्वी काळी-पिवळी टॅक्सी अनेकांचा आधार होती. मात्र काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या मनमानी कारभारामुळे त्रासलेल्या प्रवाशांनी खाजगी ओला उबेरला पसंती दिली. त्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर संक्रांत आली. आपला धंदा टिकवण्यासाठी मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने बंगळुरुस्थित 'सन टेलिमॅटिक्स' कंपनीच्या मदतीने मोबाईल अॅपची निर्मिती केली. या मोबाईल अॅपमुळे मुंबईकरांना घरबसल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सीचे बुकिंग करता येणार होते. मात्र या मोबाईल अॅपचे उद्घाटन लांबणीवर पडल्यामुळे मुंबईकरांना जुलै महिन्यापर्यंत या मोबाईल अॅपची प्रतिक्षा करावी लागणार आहे. खटुआ समितीचा अहवाल 30 जूनपर्यंत प्रसिद्ध होणार होता. मात्र आता तो 15 जुलै रोजी प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतरच काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या मोबाईल अॅपचे उद्घाटन होणार आहे. रिक्षा टॅक्सी भाडेवाढीचे दर निश्चित करण्यासाठी खटुआ समितीच्या ऑनलाईन सर्वेक्षणात आतापर्यंत 2 हजार 225 नागरिकांनी आपली मते नोंदवली आहेत.


हेही वाचा

टॅक्सी चालकांना वेग नियंत्रक यंत्राबाबत दिलासा

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीच्या ऑनलाईन सर्वेक्षणाला अल्प प्रतिसाद

आता काळ्या-पिवळ्या टॅक्सीचेही होणार घरबसल्या बुकिंग!


गेल्या 15 दिवसांत 350 टॅक्सीचालकांना मोबाईल अॅपचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोबाईल अॅपचे लाँचिंग होण्यापूर्वी 3 हजार टॅक्सी चालकांना त्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. खटुआ समितीच्या अहवालाला विलंब झाल्यामुळे आम्ही मोबाईल अॅपचे लॉचिंग पुढे ढकलले आहे, कारण खटुआ समितीच्या अहवालानंतर या वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित टॅक्सीच्या बुकिंगच्या दरात काही बदल होण्याची शक्यता असल्याचे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी सांगितले.

दरम्यान, नागरिकांनी आपापल्या दृष्टीकोनातून मते नोंदवली आहेत. त्यावर अभ्यास सुरू असून, निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. जुलै महिन्यात हा अहवाल प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुंबई ट्रान्सफार्म सपोर्ट युनिटचे संचालक आणि खटुआ समितीचे अध्यक्ष बी. सी. खटुआ यांनी सांगितले.

Loading Comments