Advertisement

मुंबईकरांनो सज्ज व्हा, शॉपिंग फेस्टिव्हलसाठी


मुंबईकरांनो सज्ज व्हा, शॉपिंग फेस्टिव्हलसाठी
SHARES

महाराष्ट्र पर्यटन महामंडळ आणि पर्यटन विभागातर्फे १२ ते ३१ जानेवारी दरम्यान मुंबईत शॉपिंग फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे.

दुबई शॉपिंग फेस्टिव्हलच्या धर्तीवर भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या शॉपिंग फेस्टिव्हलचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. या दरम्यान आठवड्याचे सातही दिवस २४ तास दुकाने आणि आस्थापने उघडी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.

#MumBuyKar संकल्पनेचा फायदा मुंबईला एक शॉपिंग डेस्टिनेशन म्हणून नावारूपाला आणण्यासाठी मदत करेल असा विश्वास रावल यांनी यावेळी व्यक्त केला.

या फेस्टिव्हलसाठी राज्य सरकारला किरकोळ विक्रेते, मोठे ब्रँड आणि मोठ्या हॉटेल्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या उपक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर असतील, असंही ते म्हणाले.



पहाटेपर्यंत नाईट बाजार

या फेस्टिव्हलदरम्यान मुंबईकर आणि पर्यटकांना 'नाईट बाजार'ची अनुभवता येणार आहे. आठवड्याच्या अखेरच्या दोन दिवसांमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत हा बाजार सुरू राहणार आहे. १९ आणि २० जानेवारी रोजी मालाडमध्ये, २६ आणि २७ जानेवारी रोजी पवईमध्ये हा नाईट बाजार आयोजित करण्यात येणार आहे. नाईट बाजारमध्ये आऊटडोर मार्केट्स, फ्लॅश मॉब्स, मेगा सेल आणि रिवॉर्ड्स अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे.


खाऊ गल्लीचं आयोजन

शॉपिंग फेस्टिव्हलचा आनंद लुटताना पर्यटकांना मुंबईतील चविष्ट खाद्यपदार्थांची चवही चाखता येणार आहे. यासाठी खाऊ गल्लीचं आयोजन करण्यात आलं आहे. आठवड्याच्या अखेरच्या दिवसांमध्ये फूड ट्रक झोन उभारला जाणार आहे. १३ आणि १४ जानेवारी रोजी वरळी सीफेस, १९ आणि २० जानेवारी रोजी मालाड तर २६ आणि २७ जानेवारी रोजी पवईमध्ये खवय्यांना निरनिराळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.


खरेदीदारांना मिळणार बक्षिसे

मुंबई शॉपिंग फेस्टिव्हल खरेदीदारांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. खरेदीदारांना या फेस्टिव्हलदरम्यान दररोज, साप्ताहिक आणि बंपर बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती रावल यांनी दिली. यासाठी पर्यटकांना नोंदणीकृत दुकानांमधून वस्तू खरेदी कराव्या लागणार आहेत. त्यानंतर एक एसएमएसदेखील करावा लागणार आहे. ३१ जानेवारी रोजी विजेत्यांची नावे घोषित करण्यात येतील.


दर आठवड्याला सांस्कृतिक कार्यक्रम

फेस्टिव्हलदरम्यान मुंबईतील १३ निरनिराळ्या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ५०० पेक्षा अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले असून क्रॉफर्ड मार्केट, वरळी सी फेस, वांद्रे बँडस्टॅड, शिवाजी पार्क, गोरेगाव, ठाणे तलावपाळी, कल्याण, जुहू, वाशी, खारघर आणि कांदिवलीत हे कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.


देशात पहिल्यांदाच कलर रन

शॉपिंग फेस्टिव्हलदरम्यान देशात पहिल्यांदाच कलर रन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत ४० देशांमधील ६ लाखांपेक्षा अधिक धावपटूंनी सहभाग घेतला असून १४ जानेवारी रोजी ही स्पर्धा पार पडणार असल्याची माहिती रावल यांनी दिली.



हेही वाचा-

मुंबईत पहिल्यांदाच 'नाईट बाजार'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा