Advertisement

खोल्या रुग्णांच्या, राहतात डॉक्टर!


खोल्या रुग्णांच्या, राहतात डॉक्टर!
SHARES

रुग्णालयातील खोल्या पेशंटसाठी असल्याचं आजवर ऐकिवात होतं. मात्र, सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंगहोम विभागातील खोल्या रुग्णालयाच्या अधिक्षकांनी आपल्या मर्जीतील दोन डॉक्टरांना दिल्या असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. तसेच, याचा परिणाम या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवर होत आहे, असा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि राज्य शासनाच्या अभ्यागत मंडळ समितीचे सदस्य संजय गुरव यांनी केला आहे.

सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंग होममधील काही पी. टी. एफ. विभागात दुरुस्ती झाल्याने, या खोल्या नर्सिंग होम विभागातील रुग्णांसाठीच देणे आवश्यक होते. मात्र, त्या आरएमओ डॉ. भूषण वानखेडे आणि डॉ. राहुल पारदे यांना देण्यात आल्या आहेत.

या विभागात 5 ते 6 खोल्यांचे दुरस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. खोल्यांचे बांधकाम आणि डॉक्टरांना देण्यात आलेल्या खोल्यांमुळे शासनाला मिळणाऱ्या महसुलावरही पाणी सोडावे लागत आहे, असेही माहिती अधिकार कार्यकर्ते गुरव यांनी सांगितले आहे.

आरएमओ यांना तात्पुरत्या त्या खोल्या राहायला दिल्या आहेत. त्या नर्सिंग होमच्या खोल्या नाहीत. त्या ऑन कॉल्स रुम्स आहेत. अनेक महिन्यांपासून त्या खोल्या बंद होत्या. पण, आता त्यांना आपत्कालीन परिस्थितीत त्या खोल्या दिल्या आहेत. पण, जर यामुळे कोणाला अडचण होत असेल, तर त्या खोल्या आम्ही पुन्हा बंद करू.

डॉ. मधुकर गायकवाड, वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

रुग्णालयाच्या आवारात 7 निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत. असे असतानाही नर्सिंगहोममधील खोली क्रमांक 2 आणि 3 मधील खोल्यांचा वापर उर्वरित निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्याचे कोणतेही प्रयोजन नाही, असेही गुरव यांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात बऱ्याच खोल्या उपलब्ध आहेत, त्यातील खोल्या देणे शक्य झाले असते. मात्र, तसे करण्यात आले नाही. तसेच यापूर्वी रुग्णालयात दिवंगत माजी राज्यपाल रा. सू. गवई आणि अती महत्त्वाच्या व्यक्तींना ज्या खोल्यांमध्ये सेवा दिली जात होती, ती खोलीही गोदाम म्हणून वापरली जात असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. रुग्णांसाठीच्या खोल्या अन्य कारणासाठी वापरतात, तेव्हा धोरण बदलले जाते. अशा बाबींसाठी संचालक आणि अधिष्ठाता यांनी पूर्वमान्यता घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करत गुरव यांनी याविषयी लेखी तक्रार करून, वैद्यकीय संचालनालयाकडे चौकशीची मागणी केली आहे.

मात्र, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक मधुकर गायकवाड यांनी माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना, संस्थाप्रमुख म्हणून संचालक आणि अधिष्ठाता यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते संजय गुरव यांनी केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. असे काही डॉक्टर्स जे. जे. रुग्णालयातही दाखल आहेत. याचा अर्थ असा होत नाही की त्यांना त्या खोल्या कायमस्वरुपी दिल्या.

डॉ. प्रवीण शिंगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन

नर्सिंग होममधील खोल्यांचे दिवसाचे भाडे 150, 500 आणि 1000 रुपये एवढे आहे. रुग्णाला जर या खोल्या राहायला दिल्या तर, त्यांच्याकडून तेवढे भाडे घेतले जाते. पण, मग ज्या डॉक्टरांना त्या खोल्या दिल्या आहेत, त्यांच्याकडून त्या खोल्यांचे भाडे का घेतले जात नाही? असा प्रश्नही संजय गुरव यांनी केला आहे.



हेही वाचा - 

आई तुझा स्तनपानावर भरोसा नाय काय?, वाडिया रुग्णालयाकडून जनजागृती

जे. जे. रुग्णालयात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा