अनेकांचे देशप्रेम फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला अचानक जागृत होते. मग त्यानिमित्ताने अनेक ठिकाणी बाईक रॅलीही काढली जाते. तर काही ठिकाणी देशभक्तीपर गीते लावली जातात. पण समाजकार्य मात्र क्वचितच लोकं करताना दिसतात.
अशाच प्रकारे माहीममधील रहिवाशांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी एक आगळावेगळा संदेश मुंबईकरांना दिला आहे. मंगळवारी 15 ऑगस्टला सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर तिथल्या रहिवाशांनी माहीमचा समुद्र किनारा स्वच्छ करायला सुरुवात केली.
वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवणारे अफरोज शाह यांनी काही दिवसांपूर्वी माहीम समुद्र किनाऱ्याची पाहणी केली आणि तिथल्या रहिवाशांना मार्गदर्शन केले होते. त्यानंतर जागरुक झालेल्या माहीमकरांनी 15 ऑगस्ट रोजी समुद्र किनारा स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतला.
यावेळी माहीमचे रहिवासी, स्वच्छता दूत म्हणून ओळखले जाणारे जय श्रृंगारपुरे, बॉम्बे स्कॉटिश हायस्कूलचे 40 विद्यार्थी, एएलएम दर्गा स्ट्रीट आणि माहीम बीच कमिटी यांनी एकत्र येत ही स्वच्छता मोहीम राबवली.
काही महिन्यांपूर्वी या स्वच्छता मोहिमेशी आपण जोडले गेलो. पण आज अनेक जण या मोहिमेशी जोडले गेले आहेत. स्वातंत्र्य दिनानिमित्त माहिमकरांनी जी स्वच्छता मोहीम राबवली त्यामुळे आनंद होत आहे.
अन्वर खान, अध्यक्ष, माहीम मोहल्ला कमिटी
सर्वांनी एकत्र येऊन अशी स्वच्छता मोहीम राबवली, तर नक्कीच मुंबईचे समुद्र किनारे स्वच्छ होतील यात शंका नाही, असेही श्रृंगारपुरे यावेळी म्हणाले.
अफरोज शहा आणि जय शृंगारपुरे यांनी वैयक्तिक पातळीवर स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. ते पाहून माहीमचा समुद्र किनारा स्वच्छ करण्याची आमचीही इच्छा होती. 15 ऑगस्टच्या निमित्ताने या स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली.
अब्दुल सत्तार, सदस्य, माहीम बीच कमिटी
हेही वाचा -
माहीम चौपाटी व्हावी 'स्पोर्टी'!
संतुलन पर्यावरण स्वच्छता अभियानाचे...!