Advertisement

इट्स आमलिशियस! आंब्याचे तब्बल १५० पदार्थ!


इट्स आमलिशियस! आंब्याचे तब्बल १५० पदार्थ!
SHARES

आंबा पिकतो, रस गळतो
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो!

एप्रिल महिना आला की बच्चे कंपनीसोबतच मोठ्यांनाही आंब्याच्या आगमनाचे वेध लागतात. खवय्यांच्या नगरीत या हापूस आंब्याची मूळ चव कायम राखत नानाविध प्रयोग करून खवय्यांना आकर्षित करण्याचं अनेक रेस्टॉरंट्सनी मनावर घेतलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'खानदानी राजधानी'! शाकाहारी थाळीसाठी प्रसिद्ध असलेल्या खानदानी राजधानीत सध्या 'आमलिशियस फेस्टिव्हल'ची धूम पाहायला मिळत आहे. आंब्याच्या वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेली थाळी खवय्यांना आकर्षित करत आहे. तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल, एवढ्या आंब्याच्या पदार्थांचा आस्वाद तुम्हाला घेता येणार आहे.



आमलिशियस फेस्टिव्हलची खासियत

इथे अतिथी देवो भव: ही मूळ परंपरा जपत टिळा लावून आणि ओवाळणी करून हसतमुखानं प्रथम स्वागत केलं जातं. टेबलावर आसनस्थ होताच ही भली मोठी थाळी आपली वाट पाहत असते. सहा-सात वाट्या, दोन-तीन डिश, दोन ग्लास असा सारा संसार मांडलेला असतो. बापरे! आता एवढ्या मोठ्या थाळीत काय काय पंचपक्वानं वाढली जाणार? माझ्यासारखीच उत्सुकता तुम्हाला देखील असेल. थाळीचा आकार पाहून ही थाळी संपेल की नाही? असाच प्रश्नच पडला होता. पण आंबा म्हणजे जीव की प्राण...मग काय सर्व पदार्थांवर ताव मारायचा ठरवूनच सुरुवात केली.



सुरुवातीला सादर केलं जातं ते 'कैरी पन्हं'... थंडगार पन्हं पोटाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन विसावतं हे कळत देखील नाही. हळूहळू खानदानी राजधानीच्या बटव्यातून एक एक पदार्थ समोर येत जातात. त्यानंतर कैरीची आंबट गोड अशी चटणी... या चटणीचा स्वाद जिभेवर पुढच्या पदार्थाचा आस्वाद घेईपर्यंत रेंगाळत राहतो. मग चटणीसोबत खायला सादर केला जातो 'मँगो रींग ढोकला'. 'मग आम दाल ढोकली' हा पदार्थ थाळीत हजर होतो. डाळीत बुडवलेला हा पदार्थ खायची मजा काही औरच!



यानंतर एन्ट्री होते ती कैरीच्या भाजीची! 'आम की लुंजी' असं नामकरण केलेल्या भाजीची चव चाखताच आंबड-तिखट अशा चवीचा आस्वाद अनुभवता येतो. यातला एक भन्नाट प्रकार म्हणजे मँगो पाणीपुरी! तिखट आणि गोड अशी ओळख असलेल्या पाणीपुरीची वेगळीच चव तुम्हाला इथे चाखायला मिळणार आहे. यामध्ये तिखट पाण्याऐवजी आमरस टाकला जातो. त्यामुळे ही हटके पाणीपुरी नक्कीच तुमच्या पसंतीस उतरेल.



एक एक करून सर्व पदार्थ थाळीत सादर केले जातात. आमखास्ता कचोरी, आमचुरी गुंदा की सब्जी, आमरस बुंदी, हापूस जलेबी, कच्ची कैरी खिचीया चाट, कैरी थेपला, करारा कैरी रोल, मँगो कॉर्न कॅनपे, मँगो लस्सी, मँगो थंडाई, आमरस... हुश्श... असं बरंच काही जे फक्त आणि फक्त आंब्यापासून बनवलंय... ही भली मोठी लिस्ट ऐकून तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटलं असेल. विशेष म्हणजे आंब्यापासून सर्व पदार्थ बनवण्यात आले असले, तरी प्रत्येकाची खासियत, नावीन्य आणि चव वेगळी असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. प्रत्येक पदार्थाची चव किती तरी वेळ तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील.



पंचपक्वानांची चव चाखायचीय?

आंब्याचे टिपिकल पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला आहे? मग अशा खवय्यांना आंब्याची आगळीवेगळी चव चाखण्याची संधी खानदानी राजधानी तर्फे उपलब्ध झाली आहे. आंब्याची पंचपक्वानं चाखण्याचा राजधानी हा उत्तम पर्याय आहे!


कुठल्या पदार्थांसोबत आंबा पेअर करता येईल? किंवा कुठल्या पदार्थासोबत आंबा मिक्सअप केला तर कशी चव येईल? हे सर्व आम्ही आधी ट्राय करतो. प्रत्येक वर्षी खानदानी राजधानीचा आस्वाद घ्यायला येणाऱ्या खवय्यांच्या संख्येत वाढच होत आहे. आमच्याकडे जवळपास आंब्यापासून बनवलेल्या १५० पाककृती आहेत.

सुगाता सेनगुप्ता, शेफ, खानदानी राजधानी



फळाच्या राजाची ही राजेशाही दावत खानदानी राजधानीमध्ये ३१ मेपर्यंत सुरू आहे. त्यामुळे तुमच्याकडे खूप वेळ आहे. सो आमलिशियस फेस्टिव्हलचा आस्वाद घ्यायचा असेल, तर नक्की घाटकोपरच्या आरसिटी मॉलमधल्या खानदानी राजधानी रेस्टॉरंटला भेट द्या.




हेही वाचा

आंबा कसा ओळखाल? काय काळजी घ्याल?


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा