Advertisement

आंबा कसा ओळखाल? काय काळजी घ्याल?

तसं बघायला गेलं तर फळांचा राज म्हणजे आंबा आणि आंब्यांचा राजा म्हणजे हापूस! आज कोणत्याही बाजारपेठेत गेल्यावर हापूसचा दर काय चाललाय? हा प्रश्न आवर्जून विचारला जातो. मग त्यानंतर नंबर येतो तो दुसऱ्या आंब्यांचा. सर्व आंब्यांमध्ये हापूसचा भाव तसा अधिकच वधारलेला असतो. पण हापूसशिवाय इतर प्रजातीचे आंबे देखील मुंबईत मिळतात. पण हे आंबे नक्की ओळखायचे कसे? आंबे घेताना काय काळजी घ्यायची?

आंबा कसा ओळखाल? काय काळजी घ्याल?
SHARES

पड पड आंब्या पडांब्या
नाही पडलास तर दगडांब्या
दगडांब्याची कोय कोय
या पोराची डोय डोय
डोईत पडला आंबा
हा तर आमचा पडांबा...!

लहानपणी हे गाणं गात आम्ही आंब्यांच्या झाडावर हल्लाबोल करायचो. आता ते दिवस गेले. पण या आठवणी आजही मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत आहेत. पिकल्या आंब्याचा मोह काही सुटत नाही. एप्रिल-मे महिन्यात सगळीकडे आंब्यांचा दरवळ पसरतो. मुंबईतल्या मार्केटमध्ये देखील आंब्याची आवक सुरू झाली आहे.

तसं बघायला गेलं तर फळांचा राज म्हणजे आंबा आणि आंब्यांचा राजा म्हणजे हापूस! आज कोणत्याही बाजारपेठेत गेल्यावर हापूसचा दर काय चाललाय? हा प्रश्न आवर्जून विचारला जातो. मग त्यानंतर नंबर येतो तो दुसऱ्या आंब्यांचा. सर्व आंब्यांमध्ये हापूसचा भाव तसा अधिकच वधारलेला असतो. पण हापूसशिवाय इतर प्रजातीचे आंबे देखील मुंबईत मिळतात. पण हे आंबे नक्की ओळखायचे कसे?


हापूस

अतिशय मधुर आणि तेवढाच महाग म्हणून ख्याती असलेल्या या आंब्याचं शास्त्रीय नाव अल्फान्सो आहे. अल्फान्सो दि आल्बुकर्क या अधिकाऱ्यानं पोर्तुगीजांच्या राजवटीत आंब्याच्या जातीच्या एका झाडाचे दुसऱ्या झाडात कलम करून हापूस या आंब्याची नवीन जात तयार केली. पण कालांतरानं अल्फान्सो या शब्दाचा अपभ्रंश होऊन भारतीय भाषेमध्ये त्याला हापूस हे नाव मिळालं.

या आंब्यांमध्ये देवगड आणि रत्नागिरी हापूस असे दोन प्रकार आहेत. आता ही वेगळी गोष्ट आहे की हापूस नेमका रत्नागिरीचा की देवगडचा यात अनेक वर्षांपासून वाद सुरू होता. पण नुकताच हापूस हा संपूर्ण कोकणाचा असल्याचं जाहीर झालं आहे.


१) देवगड हापूस

देवगड हापूसला जास्त सुगंध असतो. देवगड हापूसचा रंग पिवळसर आणि काहीसा केशरी असतो. आंब्याचा आकार बऱ्यापैकी कोयरीसारखा आहे. तर देठ लहान आणि तोंड निमुळतं असतं.

गर केशरी आणि पिकल्यावर हे फळ सुरकुतलं जातं. देवगड खूपच चवदार आणि गोड असतो. देवगड आंबा खाताना याची चव जिभेला लागते. देवगड हापूसची साल पातळ असते.


२) रत्नागिरी हापूस

रत्नागिरी हापूसला देवगड हापूसच्या तुलनेत कमी सुगंध असतो. हा आंबा पिकल्यावर त्याचा रंग पिवळा धम्मक होतो. चवीला अत्यंत गोड आणि गर थोडा कमी असतो.

 


२०० ते २५० ग्रॅम असं रत्नागिरी हापूसचं वजन असतं. इतर आंब्यांपेक्षा रत्नागिरी आंबा अधिक गोड असतो. या आंब्याची चव घशाला लागते. रत्नागिरी हापूसची साल जाड असते. 

 

३) तोतापुरी

तोता म्हणजे पोपट याच्या चोचीच्या आकाराचा आंबा. यावरूनच याला 'तोतापुरी' असं नाव पडलं. ही कर्नाटकातील प्रमुख जात असून हिला 'बंगलोरा' या नावानंही ओळखतात. तोतापुरी दोन्ही टोकाला निमुळती बाकदार असतात.



तोतापुरी आंब्याचा रंग हिरवट, पिवळसर आणि त्यावर चमकदार तांबुस पट्टे असतात. साधारण प्रतीचे असले, तरी तोतापुरी टिकाऊ असतात. भरपूर आणि नियमित उत्पादन मिळत असल्यानं हा आंबा दूरवरच्या बाजारपेठेत पाठवता येतो.


४) रायवळ

कोकणी भूमीत मुबलक संख्येने आढळणारा आंबा म्हणजे रायवळ आंबा. रंग, वास चव आणि आकारमान याबाबतीत रायवळ आंब्याची बात काही औरच! प्रत्येक झाडावरच्या आंब्याची चव वेगळी, त्याचं आकारमानही वेगळं. हापूसच्या तुलनेत रायवळ आंब्याचा रस अगदी पातळ असतो.



म्हणूनच त्याला चोखून खायचा आंबा असंही म्हटलं जातं. या आंब्याला कोणती जात नाही. कारण शेतबांधावर, परसबागेत दरवर्षी विपुल प्रमाणात लागणारा हा आंबा खाण्याचा आनंद सर्वसामान्यांपासून ते उच्चवर्गापर्यंत सर्वचजण घेतात.


५) पायरी

कोकणात रत्नागिरीतील काही भाग आणि वेंगुर्ले, कुडाळ, मालवण, कणकवली या भागात पायरी आंबा मोठ्या प्रमाणात मिळतो. 



हापूस आंब्यापेक्षा जास्त उत्पादन देणारी ही जात आहे. पायरी आंबा मध्यम आकाराचा, आकर्षक लाल रंगाचा असतो. हा आंबा रसाळ असून गोड असतो. पण पिकल्यानंतर हा आंबा जास्त काळ टिकत नाही.


६) केसर

कोकणाबरोबर पश्चिम, उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात केसर हा आंबा प्रसिद्ध मानला जातो. उत्पन्नाच्या बाबतीतही केसर आंबा हापूसपेक्षा दुप्पट असल्यानं मोठ्या प्रमाणात या आंब्याची लागवड होते. 



केसर जातीचे आंबे स्वादिष्ट आणि चवीला गोड असतात. हे आंबे पिकल्यानंतर पाच ते सहा दिवस टिकतात. हा आंबा रसाळ असल्यानं आमरसासाठी वापरला जातो.


७) दशेरी

उत्तर भारतात दशेरी जात प्रसिद्ध मानली जाते. हा आंबा मध्यम आकाराचा असून लांबट आहे.



या आंब्याचा रंग पिवळा, शेंदरी असून स्वाद आणि चव उत्तम आहे. रेषाविरहीत गर असल्यानं हा आंबा तुम्ही कापून खाऊ शकता. याशिवाय त्याच्या फोडी करून हवा बंद डब्यात ठेवल्या तरी चांगल्या टिकतात.


८) नीलम

दक्षिण भारतातील ही प्रमुख जात आहे. हा आंबा पिवळसर केसरी रंगाचा असून अकारानं अंडाकृती आहे.



नीलम जातीचा आंबा उशिरा तयार होतो. पण हा आंबा अधिक प्रमाणात आणि नियमित मिळतो.


९) रत्ना

पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सांगली, सातारा, पुणे आणि जळगाव या ठिकाणी रत्ना आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. हा आंबा छोट्या बाजारपेठांमध्ये दिसून येतो. हा आंबा हापूसपेक्षा मोठा असून घट्ट आणि रेषाविरहीत आहे. पण याची चव हापूससारखीच आहे.



हा आंबा पिकल्यानंतर चांगला आठ दिवस टिकतो. या झाडाला दरवर्षी फळं लागतात. हापूसप्रमाणे वर्षाचं अंतर यामध्ये नसतं. १९८२ साली कोकण कृषी विद्यापीठाने नीलम (नर) आणि हापूस (मादी) यांच्या संकरातून तयार केलेली ही जात आहे.


१൦) सिंधू

आकर्षक लाल रंगाची छटा असलेला सिंधू आंबा चवीला मधुर आहे. या आंब्यात कोय अत्यंत लहान असल्यानं जास्तीत जास्त आंबा खाण्याची संधी मिळते.


आंबा पिकला की त्यातून येणारा सुगंध हवाहवासा वाटतो. हा आंबा रेषाविरहीत आहे. कोकण कृषी विद्यापीठानं १९९२ साली रत्ना (मादी) आणि हापूस (नर) यांच्या संकरातून ही जात तयार केली आहे.


११) कोकण रूची

कोकण रुची हा आंबा खास लोणच्यासाठी वापरला जातो. कारण यात आंबटपणा जास्त आहे. याशिवाय लोणच्यामध्ये हा आंबा जास्त टिकतो. या आंब्याचं वजन सर्वात जास्त म्हणजेच साधारण ३०० ते ३५० ग्रॅम आहे. प्रादेशिक फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ले यांनी ही जात विकसित केली आहे.



आता तुम्हाला किती आणि कोणत्या प्रकारचे आंबे बाजारात मिळतात? हे तर समजलं असेलच. आता कुठला आंबा कसा घ्यायचा? याबाबतीत तुमचा गोंधळ होणार नाही. पण आंबा घेण्यापूर्वी काय काळजी घ्याल? याच्या या पाच टिप्स...

१) आंबा आकाराच्या मानानं वजनदार असावा. रासायनिक प्रक्रिया केलेला झाडाचा आंबा वजनानं हलका असतो.
२) आंबा हातात धरला की उबदार लागतो. कारण आंब्याच्या आत पिकण्याची क्रिया चालू असते.
३) नाकावर आपटलेला आंबा आणि गोलाकार आंबा घेऊ नये.
४) आंब्याचा सुगंध एकसारखा यावा. त्यात उग्र वास आला तर आंब्यात काही तरी गडबड आहे हे समजावे.
५) आंब्याच्या देठाचे निरीक्षण करावे. देठाजवळ पांढरी बुरशी दिसली किंवा बारीक छिद्रे दिसली तर तो आंबा घेऊ नका.



हेही वाचा

...म्हणून हा आहे 'फळांचा राजा'!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा