Advertisement

चिमुकल्या पंखांना बळ देणारी अरूंधती!

आमचं महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी अरुंधतीनं त्यांचा मुलगा मल्हारलासुद्धा या सर्वाचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे मला एवढा तरी दिलासा आहे, की आता आमचं अस्तित्व फक्त लहान मुलांच्या गोष्टींपुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यांच्या आयुष्यात देखील आमचं स्थान राहील.

चिमुकल्या पंखांना बळ देणारी अरूंधती!
SHARES

मचं जग मोठं धम्माल आहे. आकाशात बिनधास्तपणे उडणारं आमचं आयुष्य. मात्र, अशा आयुष्यालाही विसावणारं घरकूल हवं असतंच. पण मुंबईसारख्या या शहरात जिथे माणसांसाठी जागा नाही, तिथे आमच्यासाठी कशी असेल? ओळखलं नाहीत का मला? मी कुणाच्या अध्यात ना मध्यात. माझ्या गरजाही फार कमी. टिपायला चार दाणे आणि आसऱ्याला एक घरटं..मी खूष! कसलाही बडेजाव नाही की मोठं देखणं रूप किंवा मंजूळ आवाज वैगरे नाही. तरीही सर्वांना आवडणारी मी. लहान मुलांच्या बडबडगीतात, गोष्टींमध्ये वावरणारी मी चिऊताई...माझ्याच गोष्टी ऐकत मुलं लहानाची मोठी झाली. पण मोठे होताच तुम्ही सर्व मला विसरलात. काँक्रिटच्या जंगलात हिरवळीच्या आणि खाण्याच्या शोधात भटकणारी मी चिऊताई. एका झाडावर माझंही एक छोटसं घरटं होतं. पण माणसाच्या प्रगतीसाठी आमच्या घरांची मुळंच उखाडण्यात आली आणि आमचं घर देखील पत्त्याच्या बंगल्यांसारखं ढासळलं...



मुंबई जेव्हा हिरवळीनं नटलेली होती, तेव्हा आम्ही काडी काडी जमवून स्वत: कलाकुसर करून ऊन-पावसापासून संरक्षण करणारं घरटं बांधायचो. पण आता हिरवळीची जागा या मोठ्या मोठ्या टॉवरनी घेतली आहे. या उंच टॉवरमध्ये आम्हा पक्ष्यांना मुळी जागाच उरलेली नाही. पण अरुंधती म्हात्रेसारख्या पक्षीप्रेमींमुळे मला आणि माझ्यासारख्या इतर पक्ष्यांना आश्रय मिळाला. त्यांच्यामुळेच आम्हा पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येतोय. 

सध्या माझा आणि माझ्यासारख्या अनेक पक्ष्यांचा घरोबा अरुंधतीच्या छोटुशा बाल्कनीत आहे. लोअर परेल इथल्या त्यांच्या हनुमान को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत सातव्या मजल्यावर अरुंधती तिच्या कुटुंबासोबत राहते. आणि गंमत म्हणजे मी सुद्धा त्यांच्या कुटुंबातलीच एक सदस्य आहे. फक्त मीच नाही, तर माझ्यासोबतच बुलबुल, पोपट, किंगफिशर असे अनेक पक्षी तिच्या छोटुशा बाल्कनीत घरोबा करून विसावायला येतात. टिपायला चार दाणे आणि उन्हाळ्यात तहान भागवायला पाणी..अरूंधतीनं केलेली एवढीशी गोष्ट आम्हाला जगण्यासाठी पुरेश आहे!


फक्त आम्हीच नाही, तर वेगवेगळ्या रंगांच्या आणि मन नेईल तसं बागडणाऱ्या फुलपाखरांसाठी देखील अरुंधतीनं एक छानशी बाग तयार केली आहे. या बागेत अरुंधतीनं फुलपाखरांचं खाद्य असणाऱ्या वनस्पतींची लागवड देखील केली आहे. जास्वंद, लिंबू, कडिपत्ता अशी अनेक रोपं या बागेत आहेत. या वनस्पती म्हणजे फुलपाखरांचं खाद्य. त्यामुळे आमच्यासोबतच बाल्कनीत मॉर्मन, रेड पीरोट, स्वेलोटेल अशी फुलपाखरं सुद्धा सुखेनैव बागडताना दिसतात!



अरुंधती सांगते, तिच्या एका नातेवाईकांनी एकदा तिला एक शेल्टर बॉक्स गिफ्ट दिला होता. आणि मी त्या शेल्टरमध्ये विसावा घेणारी पहिली चिऊताई होते! माझ्यानंतर तिच्या या पक्ष्यांच्या घरकुलात भरपूर पक्षी आले. पण माझी आणि तिची चांगलीच गट्टी जमली होती. त्यानंतर मात्र तिची नाळ आमच्यासोबतच निसर्गाशीही जोडली गेली. आजूबाजूच्या पक्ष्यांचं ती निरीक्षण करायला लागली. माझ्यासोबतच तिनं येऊर, संजय गांधी नॅशनल पार्क या जंगलांमध्ये भ्रमंती केली. तिथूनच माझ्यासारख्याच इतर पक्ष्यांसाठीही काही तरी करावं, अशी भावना तिच्यात निर्माण झाली. यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थाशी ती जोडली गेली.



आम्हा पक्ष्यांसाठी अरुंधतीनं खूप काही केलं. २०१३ साली अरुंधतीनं तिचे पती यतीश यांच्यासोबत 'अरण्या' नावाची संस्था सुरू केली. या संस्थेच्याच माध्यमातून अरुंधतीनं एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत त्यांनी सुरू केलेली मोहीम इतर निसर्गप्रेमींपर्यंत पोहोचवली. याच उपक्रमाअंतर्गत गृहिणींना त्यांच्या बाल्कनीत किंवा खिडकीत आमच्यासारख्या पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय करण्याचं आवाहन तिनं केलं.



फक्त महिलांमध्येच नाही, तर अनेक शाळकरी मुलांपर्यंतही त्यांनी हा उपक्रम पोहोचवला. लाकडी आणि प्लॅस्टिकची घरटी पर्यावरणाला हानिकारक असल्यानं त्यांच्या संस्थने बांबू, नारळ आणि क्लेपासून शेल्टर बनवायला सुरुवात केली. जेणेकरून लोकांना कमी दरात इको फ्रेंडली शेल्टर घेता यावेत.



आमचं महत्त्व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावं यासाठी अरुंधतीनं त्यांचा मुलगा मल्हारलासुद्धा या सर्वाचं प्रशिक्षण दिलं आहे. त्यामुळे मला एवढा तरी दिलासा आहे, की आता आमचं अस्तित्व फक्त लहान मुलांच्या गोष्टींपुरतं मर्यादित राहणार नाही, तर त्यांच्या आयुष्यात देखील आमचं स्थान राहील.




हेही वाचा

जॉगिंग नाही, आता प्लॉगिंग करा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा