'रक्ताचे' डाग बघून ठरवली जाते मुलींची व्हर्जिनिटी

Mumbai
'रक्ताचे' डाग बघून ठरवली जाते मुलींची व्हर्जिनिटी
'रक्ताचे' डाग बघून ठरवली जाते मुलींची व्हर्जिनिटी
'रक्ताचे' डाग बघून ठरवली जाते मुलींची व्हर्जिनिटी
'रक्ताचे' डाग बघून ठरवली जाते मुलींची व्हर्जिनिटी
'रक्ताचे' डाग बघून ठरवली जाते मुलींची व्हर्जिनिटी
See all
मुंबई  -  

माझ्या या आधीच्या 'तुम्हालाही 'व्हर्जिन' बायकोच हवी का?' या लेखाला तुमच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. व्हर्जिनिटी हा विषय खरंतर खूप मोठा आहे. यावर आपण जेवढं बोलू तेवढाच तो अजून समजत जाणार. तरीही मी प्रयत्न करतेय तुमच्यापर्यंत काही महत्त्वाच्या गोष्टी पोहचवण्याचा. तुम्हालाही व्हर्जिन बायकोच हवी का? या लेखात आपण मुलांची मतं जाणून घेतली. पण या इतक्या सेन्सिटिव्ह विषयावर मुलींची काय मतं आहेत? मी मुलींना जेव्हा याबाबत विचारलं, तेव्हा मला ही उत्तरं मिळाली.

'No one is a Virgin. Life Screws us all'. आपण जर आपल्या देशाला प्रगतीशील आणि विकसित देश म्हणत असू तर मग हा प्रश्नच मला चुकीचा वाटतोय. जो माणूस खूप शिकलाय आणि समोरच्याचा आदर करतो हा प्रश्न विचारणारच नाही. पण दुर्दैवाने काही जणांसाठी हा खूप महत्वाचा प्रश्नही असू शकतो. प्रत्येक नात्यामध्ये पारदर्शकता असावी असं नक्कीच वाटतं. पण दोघांनीही स्वतःचा भूतकाळ विसरुन भविष्याचा विचार करायला हवा. मला जर माझ्या होणाऱ्या पार्टनरने माझ्या व्हर्जिनिटीबद्दल विचारलं तर मी त्याला उत्तर देईन. पण त्याने विचारलं म्हणून लगेच त्याला त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल मी नाही विचारणार. जर त्याला माझ्या व्हर्जिन असण्याशी किंवा नसण्याशी घेणं देणं असेल तर नक्कीच माझं उत्तर असेल, 'If I am a Lock.. then u r definitely not its key...'
- निहारिका महात्मे, आर्टिस्ट

जर मला कोणी असा प्रश्न केला तर मीही त्याला सेम प्रश्न विचारीन. पण आमच्या दोघांचंही उत्तर काहीही असो, जर आम्हाला आमचं पुढचं आयुष्य एकत्र घालवायचं असेल तर त्या उत्तरांचा परिणाम आमच्या नात्यावर होणारच नाही. जर त्याने मला सांगितलं की तो व्हर्जिन नाहीये तर माझ्यासाठी ती तेवढी महत्वाची गोष्ट नसेल. कारण तो त्याचा भूतकाळ आहे आणि भूतकाळावरुन माणसाला तो कसा आहे हे ठरवणं मला योग्य वाटत नाही. जर मला तो आवडलाय आणि माझं त्याच्यावर प्रेम आहे तर माझ्यासाठी त्याने व्हर्जिन असण्याने आणि नसण्याने काही फरक पडत नाही.
- अपूर्वा महाडिक, विद्यार्थी

मी स्वतः एका रिलेशनशिपमध्ये आहे. पण माझ्या BF ने कधीच मला मी व्हर्जिन आहे की नाही असा प्रश्न विचारला नाही आणि जर यापुढेही त्याने हा प्रश्न विचारला तर नक्कीच मी त्याला खरं उत्तर देईन. पण मग मी त्यालाही त्याच्या व्हर्जिनिटीबद्दल विचारेन. त्याच्या उत्तरामुळे आमच्या नात्यात काही बदलेल असं मला वाटत नाही. जर तुम्ही खरंच तुमच्या नात्याचा खूप गांभीर्याने विचार करत असाल तर त्या गोष्टींना तेवढं महत्त्व देणं मला तरी नाही पटत. हा प्रश्न बऱ्याचदा मुलांकडूनच केला जातो. म्हणजे तुझं याआधी अफेअर होतं का? आणि जर त्या मुलीचं उत्तर हो असेल तर त्या अफेअरच्या वेळावरुन तिचे शारीरिक संबंध असतील असं ठरवून मुलं मोकळे होतात. पण प्रत्येकवेळी ते खरंच असेल असं नाही.
- रक्षा शेट्ये, मार्केटिंग

होणाऱ्या जोडीदाराला तू व्हर्जिन आहेस का? असं विचारणं हा प्रश्नच मुळात मला चुकीचा वाटतो. व्हर्जिनिटीवरुन कोणी माझं किंवा त्याचं कॅरेक्टर नाही ठरवू शकत. मी जे काही माझ्या भूतकाळात केलं असेल ते स्वतःच्या सहमतीनेच केलं आणि गोष्टी वेळेनुसार बदलतात. मुलाच्या व्हर्जिनिटीबद्दल सांगायचं झालं तर मला स्वतःलाच व्हर्जिन मुलगा नकोय. हे ऐकायला कदाचित विचित्र वाटेल पण काही गोष्टींमध्ये अनुभवी जोडीदार मिळालेलाच बरा आणि मला वाटतं तसा मला मिळावा.
- श्रिया सिंग, विद्यार्थी

आपल्या समाजात सुरवातीपासूनच मुलीला वेगळ्या आणि मुलांना वेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. म्हणजे मुलांशी जास्त बोलायचं नाही, जास्त बाहेर फिरायचं नाही. अर्थात आता थोडं का होईना हे सगळं बदलतंय. पण आपल्या जोडीदाराला कोणते प्रश्न विचारायचे किंवा कोणते नाही हे तर आपणच ठरवतो ना? जर मुलीने सांगितलं की ती व्हर्जिन नाही तर तिचं कॅरेक्टर खराब असं ठरवलं जातं. पण मला असं वाटतं की जर मला समोरचा मुलगा आवडतोय तर मला त्याच्या व्हर्जिनिटीचा प्रश्नच पडणार नाही. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचा आदर करणं हे जास्त महत्त्वाचं आहे.
- प्राजक्ता मुळे, विद्यार्थी

मी सध्या लग्नासाठी मुलं बघतेय... आणि हो बघितलेल्या प्रत्येक मुलाला तू व्हर्जिन आहेस का? हा प्रश्न विचारला आहे आणि मला कोणत्याही मुलाकडून 'हो' हे उत्तर मिळालं नाही. अर्थात मुलांची व्हर्जिनिटी ओळखता येणं कठीणच आहे. पण तरीही हा प्रश्न मी विचारते. मी स्वतः व्हर्जिन आहे. माझ्या आणि माझ्या जोडीदारासाठी पहिला शरीरसंबंध ही खूप महत्त्वाची गोष्ट असेल. त्यामुळे मला नक्कीच असं वाटतं की मलाही व्हर्जिन नवराच मिळावा. पण तसा मिळेलच ह्याची शक्यता मात्र कमीच आहे.
- भक्ती श्रीवास्तव, अकाउंटंट

ह्या सगळ्या प्रतिक्रियांवरून तरी हेच लक्षात येतं की मुलांसाठी व्हर्जिनिटी महत्त्वाची असते तेवढी नक्कीच मुलींसाठी नाही.

जेव्हा मी ह्या विषयवार लिहायचं ठरवलं आणि मुलामुलींशी बोलले त्यावेळी माझ्या मनात सर्वात आधी आलेला प्रश्न मुलांची व्हर्जिनिटी कशी ओळखावी? याची उत्तरं कोणाकडेच नाहीत. कारण ती ओळखताच येत नाही. मी यासंदर्भात प्रसिद्ध गायनॅकोलॉजिस्ट रंजना धानू यांच्याशीही बोलले. तेव्हा त्यांच्याकडून ही माहिती मिळाली.

व्हर्जिनिटी जाते म्हणजे नेमकं काय?
स्त्रियांच्या योनीत (व्हजायना)मध्ये एक पातळ पडदा असतो. ज्याला वैद्यकीय भाषेत 'हायमन' असं म्हणतात. तो पडदा जेव्हा फाटतो तेव्हा त्याला हायमन स्प्लिट होणे असं म्हणतात. फक्त शारीरिक संबंधानेच हायमन स्प्लिट होतं असं नाही. त्याची अनेक कारणं आहेत. जसं सायकलिंग, जिम्नॅस्टिक, रनिंग यामुळेही बऱ्याचदा हायमन स्प्लिट होऊ शकतं.

फक्त शारीरिक संबंधानेच मुलीची व्हर्जिनिटी जाते असं समजणाऱ्या लोकांनी किमान वर लिहिलेल्या गोष्टी तरी लक्षात ठेवाव्यात. आज किती मुली ट्रेकिंग करतात. व्यायामासाठी सायकलिंग करतात. फिट राहण्यासाठी जिमिंग करतात. मग फक्त शरीरसंबंधाच्याच मुद्द्याचा विचार करुन तेच कारण असेल असं कसं म्हणून चालेल? या सगळ्या गोष्टी जरी सोडल्या तरी महिलांची सध्याची जीवनशैली आपण सगळेच बघतोय. घर सांभाळून नोकरी करण्याच्या तारेवरच्या कसरतीत महिलांच्या शरीराची किती ओढाताण होते? अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर घरी लवकर जाण्याच्या घाईत जिवाच्या आकांताने गाडी पकडण्यासाठी धावणाऱ्या कित्येक महिला रोज आपण पहातो. मग तिला हे असे प्रश्न विचारताना स्त्री म्हणून न बघता माणूस म्हणून तिचा विचार का केला जात नाही?

या विषयाचा अभ्यास करताना अजून एक धक्कादायक माहिती मला मिळाली. कंजरभाट नावाचा एक विमुक्ती समाज आहे. त्यांच्यात लग्न होतं त्याच दिवशी शरीरसंबंध ठेवले जातात. शरीरसंबंधांच्या आधी
मुलीला पूर्ण नग्न करून तिच्या अंगावर काही अणुकुचिदार वस्तू तर नाही ना याची खात्री करुन तिला पुन्हा कपडे चढवले जातात. नंतर मुलाकडची एखादी महिला मुलाला एक पांढरं फडकं देते आणि त्या मुलीला 'सुहागरात'साठी मुलाच्या खोलीत पाठवलं जात. सकाळपर्यंत त्या दोघांच्या घरातली काही ज्येष्ठ माणसं (पंचायत) त्यांच्या खोलीच्या बाहेरच बसतात. सकाळी तो मुलगा बाहेर येतो. त्याच्या हातातलं पांढरं फडकं पंचायतीतल्या एकाच्या हातात देतो. ती व्यक्ती ते फडकं बघते आणि मग ठरवलं जातं 'माल खरा ठरला की खोटा'. मग ते ओरडून सगळ्यांना सांगितलं जातं. त्यानंतर मग सगळे आपापल्या घरी जातात. आणि दुसरीकडे खोलीच्या कोपऱ्यात मुलगी देवाचे समाधान मानत बसते. या समाजातल्या नियमानुसार प्रत्येक मुलीला लग्नानंतर आपलं कौमार्य सिद्ध करावं लागतं. मुलगी तसं करु शकली नाही, तर तिला समाजातून बहिष्कृत करण्यात येतं. काही वर्षांपूर्वी या प्रथेविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. परंतु त्यापुढे त्याचं काय झालं हे मात्र कळू शकलं नाही. आजही तिथे मुलींना या अग्नीपरीक्षेचा सामना करावाच लागतो. किती भयंकर आहे हे सगळं? डोकं अगदी बधीर करुन सोडणारं. त्या पांढऱ्या फडक्यावरचे रक्ताचे थेंब मुलीची व्हर्जिनिटी ठरवतात. आणि जर ते नाही दिसले तर? हा विचारच किती थरकाप उडवतो.

तिथे हे सर्व एका प्रथेचा भाग म्हणून केलं जातं. पण त्यामुळे त्या मुलीला जास्त लांब शिकायला पाठवलं जात नाही , तिचं लवकर लग्न केलं जातं आणि सतत तिच्यावर पाळत ठेवली जाते. हे सगळंच किती भयंकर आहे. या सगळ्याचा विचार केल्यावर वाटतं आपला समाज कधी सुधारु शकेल? मला बऱ्याच लोकांचे मेसेजेसही आले होते की, लग्नानंतर शारीरिक संबंध ठेवल्यावर ती व्हर्जिन नाही असं समजलं म्हणून कित्येक मुलांनी बायकोला सोडून दिलंय. मग तिने कितीही जीवाच्या आकांताने सांगितलं, तरीही तिच्यावर कोणाचाच विश्वास बसत नाही. बरं हे फक्त अडाणी मुलांकडूनच केलं जातंय असं नाही, तर अगदी शिकलेल्या मुलांकडूनही अशा गोष्टी केल्या जातात.

मी लिहिलेल्या या गोष्टी काहींना पटतील किंवा काहींना अजिबात पटणार नाही. मी मुलींची बाजू घेऊन सगळं लिहिलं आहे असंही कदाचित वाटेल. पण व्हर्जिनिटीवरुन समोरच्याचं कॅरेक्टर ठरवताना, मुलाला किंवा मुलीला प्रश्न विचारताना या सगळ्या गोष्टींचा एकदा तरी नक्की विचार करा.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.