Advertisement

पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग या ५ ठिकाणी अनुभवा मजा, मस्ती आणि थ्रिल

एक किंवा दोन दिवसांत तुमची सहल होईल अशा काही मुंबईजवळील पर्यटनस्थाळाची माहिती आज सांगणार आहोत. एक ते दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासमवेत फिरायला जाऊ शकता.

पावसाळ्यात फिरायला जायचंय? मग या ५ ठिकाणी अनुभवा मजा, मस्ती आणि थ्रिल
SHARES

पावसाळा! सर्वांचा एक अतिशय आवडता ऋतू. पावसाच्या सरी कोसळायला सुरूवात झाली तसे मित्रमंडळी, ऑफिस गँग पावसाळी पिकनिकचा प्लॅन करतात. शहरापासून दूर जंगलात डोंगरदऱ्यांमध्ये अथवा कुठल्याही निसर्गरम्य ठिकाणी पावसामध्ये चिंब भिजण्याचा आनंद काही औरच असतो. पण, ऑफिसच्या कामामुळे सर्वांना मोठी सुट्टि मिळेलच असं नाही. मग आठवड्याच्या एक दिवसाच्या सुट्टीमध्ये काय करायचे? ते करता येते. एक किंवा दोन दिवसांत तुमची सहल होईल अशा काही मुंबईजवळील पर्यटनस्थाळाची माहिती आज सांगणार आहोत. एक ते दोन दिवसाच्या सुट्टीमध्ये तुम्ही मित्रांसोबत किंवा कुटुंबासमवेत फिरायला जाऊ शकता.

१) सुला वाईनयार्ड

द्राक्षांच्या मळ्यांमध्ये भटकण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी सुला वाईनयार्ड हा चांगला पर्याय आहे. संपूर्ण वाईनयार्ड आणि वायनरीच्या सहलीसोबत ग्रेप-टू-ग्लासचा अनुभव घ्यायचा असेल किंवा सुला बियाँड या विलक्षण इन-हाउस व्हिलामध्ये निवास करायचा असेल तर सुला वाईनयार्ड एक दिवसाच्या सहलीसाठी किंवा तेथे थांबून विकेंड साजरा करण्यासाठी एक परिपूर्ण ठिकाण आहे. कॅफे रोज इथं तुम्ही जेवण करू शकता. याशिवाय स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त विहार करा किंवा गावातल्या रस्त्यांवर सायकलनं फेरफटका मारू शकता. 


सुला वाईन यार्डकडे जात असताना वळसा घेऊन आपण वैतरणा धरणालाही जाऊ शकता ज्याला मोडक सागर धरण असंही म्हटलं जातं जे वैतरणा नदीवर बांधलेले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे हे धरण नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी इथं स्थित आहे. सुंदर सरोवर आणि नयनरम्य परिसरासाठी इगतपुरी प्रसिद्ध आहे. 

बुकिंगसाठी तुम्ही सुलाच्या वेबसाईटला भेट द्या.

 

२) कोलाड

रायगड जिल्ह्यातील कोलाड हे ठिकाण त्याच्या कुंडलिका नदीमधील व्हाईट वॉटर राफ्टिंग आणि ट्रेकिंगच्या पायवाटांसाठीही प्रसिद्ध आहे. सह्याद्री पर्वतरांगांच्या पुढ्यात वसलेले आणि मुंबईपासून १२१ किमी अंतरावरील कोलाड हे नेहमीच साहसी क्रीडाप्रकारांनी गजबजलेले असते. 


राफ्टिंगशिवाय इथं निवड करण्यासाठी कॅनोइंग,  कायाकिंग,  रिव्हर झिप लाईन क्रॉसिंगचे पर्यायही उपलब्ध आहेत. वॉटरफॉल रॅपलिंग आणि माउंटन बायकिंग यासारख्या क्रीडाप्रकारांकडे साहसी क्रीडाप्रकारांचे चाहते आकर्षित होऊन कोलाडला येत असतात.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टुरिझमच्या वेबसाईटला भेट द्या. 


३) कर्नाळा पक्षी अभयारण्य

पक्षी निरीक्षण, नैसर्गिक पाऊलवाटांवरून ट्रेकिंग करणं आणि किल्ल्याला भेट देण्याची तुमची इच्छा कर्नाळामध्ये पूर्ण होईल. पनवेलपासून १२ किमी अंतरावर असलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य १२.११ चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं आहे. हे एक विलक्षण दुर्मिळ ठिकाण आहे. इथं निवासी पक्ष्यांच्या १५० प्रजातींचे आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या ३७ प्रजातींचे निवासस्थान आहे.


पक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. कर्नाळा किल्ल्याची निर्मिती देवगिरीच्या यादवांनी केली होती. पण नंतर त्याला तुघलकाने काबीज केले होते. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर इथून मुंबई बंदराचे विहंगम दृश्य आपल्या नजरेस येते.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टुरिझमच्या वेबसाईटला भेट द्या. 


४) रतनवाडी

सह्याद्रीतल्या रतनगड नावाच्या एका नितांतसुंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले सुंदर गाव! अमृतेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर, मंदिराजवळ अप्रतिम पुष्करणी, एकीकडे भंडारदरा धरणाच्या जलाशयाची सोबत तर दुसरीकडे डोंगररांगांचा शेजार!

मुंबईहून १८० किलोमीटर अंतरावर भंडारदरा आहे. तर भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर २० किलोमीटरवर आहे.  गेल्यावर रतनगड किल्ला आणि हेमाडपंती स्थापत्यशैलीचे अमृतेश्वर मंदिर हे पर्यटकांचे आकर्षण ठरतात. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक शिवलिंग आहे, पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.

 अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टुरिझमच्या वेबसाईट भेट द्या


५) भिलार गाव (पुस्तकाचं गाव)

एखाद्या निवांत आणि शांत ठिकाणी विसावा घ्यायचा असेल तर महाबळेश्वरमधील भिलार हे गाव तुमच्यासाठी योग्य आहे. नाही ट्रेकिंग करायची नाही कुठल्या धबधब्यावर जायचं. चहाचे घुटके घेत एखादं छानसं पुस्तक वाचण्याची इच्छा असेल तर भिलार या पुस्तकांच्या गावाला भेट द्यायला काही हरकत नाही. 


लालेलाल स्ट्रॉबेरी म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर. महाबळेश्वरला जाताना मध्येच या गावाचा रस्ता आहे. चढ-उतार असलेला रस्ता पार करत आत गेल्यावर मूळ भिलार गाव दिसतं. महाबळेश्वरच्या डोंगरकुशीत स्ट्रॉबेरी पिकवणाऱ्या या गावात तब्बल पंधरा हजाराहून अधिक पुस्तकं वस्तीला आहेत. गावातील मंदिर, स्थानिक नागरिकांची घरं, हॉटेल, लॉज, शाळा अशा ठिकाणी पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. राज्य सरकार तर्फे नेमण्यात आलेल्या समितीनं कथा, कविता, कादंबरी, ललित लेखन, क्रीडा विषयक, विज्ञान विषयक साहित्य, वैचारिक साहित्य, चरित्र. आत्मचरित्र अशा २५हून अधिक वाड्मय प्रकारांची निवड केली आहे.



हेही वाचा

या '९' टिप्सच्या मदतीनं घ्या पावसाळ्यात त्वचेची काळजी

फवारणी न केलेल्या भाज्या खायच्यात? मग मातीविना टेरेसवर फुलवा शेत मळा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा