सेक्सवर बोलायला लाज कसली?

 Mumbai
सेक्सवर बोलायला लाज कसली?
Mumbai  -  

'अगं काय सांगू तुला? गुड्डूच्या बॅगेत घाणेरडं मॅगझिन सापडलं. गुड्डूच्या बाबांनी खूप मारलं गं त्याला', रडत रडतच काकू सांगू लागल्या. 'तू समजवं गं त्याला'. काकीला होकार दिला. या विषयावर सविस्तर बोलायचं म्हणून मी दुसऱ्या दिवशी गुड्डूला घेऊन बाहेर गेले. इकडच्या तिकडच्या विषयांवर बोलता बोलता मी त्याला घडलेल्या प्रकाराबद्दल विचारलं. तेव्हा तोही भांबावला. मी असे प्रश्न त्याला सरळच विचारत होते म्हणून असेल. पण त्याचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला. 'मी आईला विचारलं की मी कसा आलो या जगात? तर ती मला ओरडली. असे प्रश्न विचारायचे नाहीत, असं तिनं दमटावून सांगितलं. शाळेत पण मित्र बोलतात, टीव्हीवर मुलगा आणि मुलगी जवळ आले की चॅनेल बदलतात. का पण असं? आम्हाला कोण नीट सांगतच नव्हतं.' मग चिंटूनं त्याच्या घरातून ते मॅगझिन आणलं. गुड्डूच्या उत्तरानं खरंच मला विचार करायला भाग पाडलं. काकूंना खरं सागितलं तर त्या गुड्डूलाच मारायला गेल्या. त्यांना अडवून स्पष्ट सांगितलं की, 'यात तुमचीच चूक आहे. जर वेळेवर तुम्ही त्याला लैंगिक शिक्षण दिलं असतं, तर आज ही वेळ आलीच नसती.' काका माझ्यावरही डाफरले, 'मग काय त्याच्या असल्या अश्लील प्रश्नांची उत्तरं द्यायला हवीत का? सहावीत आहे अजून तो आणि हे काय वय आहे त्याचं या सर्व गोष्टींसाठी?' इथेच अडकते आपली गाडी. 

सेक्स एज्युकेशन...अरे बापरे! हा टॅबू विषय भारतीय मानसिकतेच्या कसला पचनी पडतोय? त्यात सेक्स हा विषय थेट शिक्षणाशी जोडायचा म्हणजे तोबा रे तोबा! आपल्या संस्कृतीला शोभण्यासारखं नाही हे. त्यामुळे हा विषय तसा अडगळीतच टाकला जातो. समाजाची मानसिकता ठरलेली आहे आणि ती म्हणजे, या गोष्टी मुळात शिकवायची किंवा सांगायची गरजच काय? समजण्याएवढं वय झालं की, कळतंच की. पण आपोआप समजण्याचे धोकेही अधिक आहेत. मुलं मोठी होताना टीव्ही, इंटरनेट या माध्यमातून अनेक गोष्टी पाहतात किंवा इतर कुठूनतरी कानावर पडतात. त्यामुळे मुलांच्या मनात अनेक प्रश्नही निर्माण होतात. एक तर त्यांना पडलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा दमदाटी करून 'असे प्रश्न विचारायचे नाहीत,' असं खडसावलं जातं. त्यामुळे असे प्रश्न पुन्हा विचारायची मुलांची हिंमतच होत नाही. मग काय, शेवटी याची उत्तरं ते आपापल्या परीनं शोधायला जातात.

'बालक पालक' हा मराठी सिनेमा आपल्यापैकी बहुतेकांनी पाहिला असेल. पण आपल्यापैकी बहुतेकांनी त्यातलं मनोरंजन तेवढं घेतलं. पण मूळ विषय मात्र अनुत्तरीतच राहिला. मुलं वयात येत असताना अशा गोष्टींबद्दल त्यांना वाटणारी उत्सुकता कधी आकर्षणात परावर्तित होते आणि त्याचं रुपांतर कधी सवयीत होतं, हे त्या मुलांनाही समजत नाही. मग या वयात पडलेल्या आणि घरातल्या थोरामोठ्यांनी टाळलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पॉर्नसाईट, सेक्स मॅगझिन्स अशा एक ना अनेक मार्गांचा अवलंब ही मुलं करतात.

मी या परिस्थितीतून गेलो आहे. आठ वर्षांचा असताना सेक्स संदर्भातल्या गोष्टींचं आकर्षण वाटायचं. त्यामुळे मी पॉर्न व्हिडिओ पाहायला लागलो. तसेच काही सेक्स संदर्भातल्या कॉमिक बुक्स वाचायचो. पण त्यामुळे नीट काही कळायचं नाही.

-विकास ( बदलेलं नाव )


शाळेत असणाऱ्या मुलांना लैंगिक शिक्षण देणं अतिशय आवश्यक आहे. सध्या टीव्ही, इंटरनेट आणि सोशल मीडियावर त्यांना खूप लहान वयातच नको ती आणि अर्धवट माहिती मिळते. या सर्वांचा परिणाम म्हणजे त्यांच्या शरीरातील हार्मोन्समध्ये फार कमी वयात वाढ आणि बदल होतात. याचे पडसाद त्यांच्या वागणुकीतून दिसू लागतात. अनेक मुलांचं लहान वयातच शारिरीक शोषण केलं जातं. मुळात मुलांना कल्पनाच नसते त्यांच्या शरीरासोबत नेमकं काय केलं जात आहे याची. जर योग्य वयात सेक्स एज्युकेशन दिलं, तर मुलांचं होणारं लैंगिक शोषणही त्यामुळे कमी होईल.

मीना पवार, पालक

नुकतीच शॉपिंगसाठी एका मार्टमध्ये गेले होते. तेव्हा एका छोट्या मुलानं रॅकमध्ये असलेलं  व्हिस्परचं पॅकेट हातात घेतलं आणि 'हे काय आहे आई? हे कशाला वापरतात?' असं विचारलं. त्यावर त्याची आई त्याला ओरडली, 'किती वेळा बोलले तुला असले प्रश्न विचारू नकोस'. बिचारा गप्पच बसला. पौगंडावस्थेत असलेल्या मुलांच्या शरीरात वेगानं बदल होत असतात. मानसिक, भावनिक बदल तर होतच असतात. विरुद्ध लिंगी व्यक्तींबद्दल वाटणाऱ्या आकर्षणाचं नक्की काय करायचं? व्यक्त कसं करायचं? असे अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात. लैंगिक विषयासंबंधी ज्ञान आणि जागरुकतेच्या अभावामुळे मुलांवर मानसिक ताण येतो. फार कमी कुटुंबांमध्ये आई-वडील मुलांचे मित्र होतात. मग उत्सुकतेपोटी अनेक मुलं नको त्या गोष्टींकडे वळतात. कुमारवयीन मुलांचा सहभाग बलात्कार, छेडछाड अशा गुन्ह्यांमध्ये अधिक वाढण्यामागे हेही एक कारण आहेच. एवढंच नाही, तर अनेक अल्पवयीन मुलांना लैंगिक छळाला सामोरं जावं लागतं. कधी परिचितांकडूनच, तर कधी अनोळखी व्यक्तींकडून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात. मुळात, आपल्या शरीरावर फक्त आपलाच हक्क असतो आणि कुणीही आपल्या इच्छेविरुद्ध आपल्याला स्पर्श करू शकत नाही, हे मुलांना समजावण्याची गरज आहे.

मी लहान असताना माझ्यासोबत एक घटना घडली होती. ७-८ वर्षांची असताना मी बेबीसिटींगला राहायचे. पण त्यांचा मोठा मुलगा मला स्पर्श करायचा. मला कळायचंच नाही. 'आपण गेम खेळूया' असं बोलून तो माझ्या गुप्तांगाला हात लावायचा. वय समजण्यासारखं होतं, पण कधी कुणी याबद्दल सांगितलंच नाही. त्यामुळे या गोष्टी कळल्याच नाहीत. पण मोठी झाल्यावर जेव्हा या गोष्टी समजू लागल्या, तेव्हा कळालं की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं होत होतं.

मिनल (बदललेलं नाव)


मुली साधारणपणे नऊ ते चौदा वर्षांपर्यंत वयात येतात. तर मुलं दहा ते सतरा वर्षांपर्यंत वयात येतात. या वयात लैंगिकता हा आयुष्याचा नैसर्गिक, सामान्य आणि आरोग्यदायी भाग आहे हे शिकवणं गरजेचं असतं. यासाठी लैंगिक शिक्षणाची स्वतंत्र तासिका असणं उत्तमच. पण एरवी हे ज्ञान त्यांना जाणीवपूर्वक परंतु सहजपणे दिलं जावं. उदा. विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातून, भाषाविषयातून वगैरे..महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लैंगिक शिक्षणाची आवश्यकता म्हणून एक पत्रिका प्रकाशित केली आहे. ती प्रत्येक मुलामुलीला वाचायला दिली पाहिजे. त्यानंतर त्यांच्यात गटचर्चा घडवून आणावी. त्यांना काही शंका असतील तर शिक्षकांनी त्यांचे निरसन करायचे. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शिक्षकाला लैंगिक शिक्षणाचे शास्त्रशुद्ध ज्ञान हवे. यासाठी डी.एड.,बी.एड.च्या अभ्यासक्रमात याचा समावेश केला जावा. आजही बहुतांश शाळेत मासिक पाळीसंदर्भात माहिती देताना वर्गातील मुलांना बाहेर काढले जाते. मग मुलींना माहिती दिली जाते. हे सगळं बदललं पाहिजे. 

 डॉ. अरविंद रेडकर, शिक्षण तज्ज्ञ

सेक्स एज्युकेशनमध्ये फक्त शरीरसंबंध कसे होतात हेच सांगितलं जात नाही. तर योग्य आहार, शरीराची माहिती, अवयवांची माहिती, मासिक पाळी, गर्भधारणा, प्रसूती, एचआयव्ही, एड्स, गुप्तरोग याबद्दलची माहितीही टप्प्याटप्प्याने देता येते. चांगला-वाईट स्पर्श कसा ओळखायचा? हे सुद्धा मुलांना सांगितलं पाहिजे. तेरा-चौदा या वयात सेक्स एज्युकेशन देण्यात काही गैर नाही. पण हल्लीची परिस्थिती पाहता नवव्या किंवा दहाव्या वर्षीच लैंगिक शिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे. फक्त माहिती देऊन उपयोग नाही, तर त्यांच्या मनातील घालमेल समजून घेण्यासाठी वयाच्या प्रत्येक टप्प्यात त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे.

सेक्स एज्युकेशन ही काळाजी गरज झाली आहे. साधारण १३-१४ व्या वर्षी सेक्स एज्युकेशन दिलं गेलंच पाहिजे. सेक्स एज्युकेशन हे मुलांना सेक्स कसा करायचा? हे शिकवलं जात नाही, तर याद्वारे मुलांना सेक्स संदर्भातील शारीरिक, मानसिक आणि जैविक पैलूंबद्दल माहिती मिळते. लैंगिक शोषण, जन्म नियंत्रण उपाय, एड्स आणि एसटीडी, लिंग ओळख याविषयीही सेक्स एज्युकेशनमुळे माहिती मिळते.

डॉ. शिल्पा घोबळे, डॉक्टर

या विषयाचा अभ्यास करताना काही व्हीडिओ पाहिले. अगदी ७-८ वर्षांच्या मुलाला सेक्स संदर्भात पडलेले प्रश्न आणि त्याच्या प्रश्नांचे निरसन करणारे त्याचे बाबा. 

खरंतर एक मित्र म्हणून पालक आपल्या मुलांशी संवाद साधत आहेत, हे चित्र क्वचितच पाहायला मिळतं. मुळात अशा विषयांवर मुलांशी संवाद साधण्याची पहिली जबाबदारी ही पालकांचीच आहे. कारण त्यांचं मुलांशी असलेलं नातं हे शिक्षक-विद्यार्थी या नात्यापेक्षा जास्त जवळचं असतं. त्यामुळे आधी पालक आणि नंतर शालेय व्यवस्थेच्या माध्यमातून मुलांना लैंगिक शिक्षण देणं गरजेचं आहे. लैंगिकतेबद्दल मुलांना पडणाऱ्या प्रश्नांचं निरसन वेळोवेळी झालं, तर भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना आवर घालता येईल. यासाठी पालकांनी आपल्या दृष्टिकोनात आणि शिक्षण व्यवस्थेने शिक्षण पद्धतीमध्ये अमूलाग्र बदल करणं आवश्यक आहे, आणि काळाची गरजही!

Loading Comments