Advertisement

वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायचीये? मग निसर्गावर प्रेम हवंच - सागर गोसावी

सागर गोसावी या अस्सल मराठमोळ्या फोटोग्राफरनं गेल्या १६ वर्षांमध्ये अगणित कथा त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपल्या. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये त्याचा हातखंडा! देशभरातल्या प्राण्यांशी कॅमेऱ्याच्या लेन्समधून मैत्री केलेल्या या माणसाला अजूनही वाटतंय की फोटोग्राफीमधलं बरंच काही शिकायचं राहून गेलंय!

वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायचीये? मग निसर्गावर प्रेम हवंच - सागर गोसावी
SHARES

'फोटोग्राफी ही अशी कथा आहे, जी मी शब्दांत मांडण्यात अपयशी ठरलो'... क्विन्सलॅण्डमधल्या डेस्टिन स्पार्क्स नावाच्या अतरंगी फोटोग्राफरनं फोटोग्राफीचं हे गुपित कित्येक वर्षांपूर्वी सांगून ठेवलं होतं. आणि जगातल्या बहुतेक सर्व फोटोग्राफर्सना ते पटलं होतं...पटत आहे...आणि पटत राहील. मुंबईतल्या अशाच एका फोटोग्राफरला मी जेव्हा भेटले, तेव्हा हे वास्तव का पटतं, याचा प्रत्यय आला!



सागर गोसावी या अस्सल मराठमोळ्या फोटोग्राफरनं गेल्या १६ वर्षांमध्ये अशा अगणित कथा त्याच्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपल्या. वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये त्याचा हातखंडा! पण देशभरातल्या प्राण्यांशी कॅमेऱ्याच्या लेन्समधून मैत्री केलेल्या या माणसाला अजूनही वाटतंय की फोटोग्राफीमधलं बरंच काही शिकायचं राहून गेलंय!

माझं लहानपण रत्नागिरीतल्या उरणमध्ये गेलं. आजूबाजूला तिवरांचं जंगल आणि सोबत किनारपट्टीचा परिसर. भरपूर फ्लेमिंगो यायचे! दररोज शाळा संपली, की माझं एकच काम असायचं..पक्षीनिरीक्षण! आणि त्यातही फ्लेमिंगोंना पाहाणं म्हणजे तर माझ्यासाठी पर्वणीच! हळूहळू मी त्यांचे फोटो काढायला लागलो आणि पुढे वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा माझ्या आयुष्याचा छंदच बनला!

सागर गोसावी, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर

वाईल्डलाईफ फोटोग्राफर होण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये काय असायला हवं? या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता सागर गोसावी म्हणाले, "त्या व्यक्तीचं निसर्गावर प्रेम असायला हवं!"


निसर्गासोबत संवाद हवा!

गोसावींच्या मते, वाईल्डलाईफ फोटोग्राफी हा फोटोग्राफीचा एक अवघड प्रकार आहे. वेडिंग फोटोग्राफी, पोर्ट्रेट फोटोग्राफी, सिलोव्हेट फोटोग्राफी अशा प्रकारांमध्ये आधी तुम्ही फोटोग्राफी शिकता आणि मग तुमच्या आवडीचा प्रकार निवडता. पण, वाईल्डलाईफ फोटोग्राफीमध्ये तुम्हाला मुळातच निसर्गावर प्रेम असायला हवं. तुम्हाला प्राण्यांच्या वागणुकीचाही अभ्यास करणं आवश्यक असतं.



भारतात वाईल्डलाईफ फोटोग्राफी कठीण!

सागर गोसावींना वाईल्डलाईफ फोटोग्राफर्सनी पेशन्स ठेवणं गरजेचं वाटतं. 'भारतात तुम्ही फक्त वाईल्डलाईफ फोटोग्राफी सुरु केली आणि लगेच पैसे मिळू लागले असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला वाट पहावी लागते. संयम असावा लागतो. इथे तुमचे फोटो तुम्हाला फुकटात द्यावे लागतात. पण बाहेरदेशात तुमच्या फोटोंना चांगली किंमत मिळते.'

सागर गोसावी स्वत: एका आयटी कंपनीमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. १० वर्ष त्यांनी आयटी कंपनीमध्ये काम केल्यानंतर पूर्णवेळ वाईल्डलाईफ फोटोग्राफीवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. आर्थिकदृष्ट्या त्यांच्यासाठी हा कठीण निर्णय होता. आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी त्यांनी व्यावसायिक फोटोग्राफी करायला सुरुवात केली. एसजीपी अर्थात 'सागर गोसावी फोटोग्राफी'च्या माध्यमातून देशभरात वाईल्डलाईफ फोटोग्राफीच्या टूर आणि कार्यशाळा आयोजित करतात. ते स्वत: कॅनन इंडियाचे ब्रॅण्ड अॅम्बेसिडर आहेत.


मोठ्या गुंतवणुकीची तयारी ठेवा!

'तुम्हाला वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायची असेल, तर त्यासाठी मोठी गुंतवणूक करायची तयारी हवी' असंही गोसावी सांगतात. या फोटोग्राफीमध्ये तुम्हाला आधुनिक यंत्रसामग्री आणि मोठमोठ्या कॅमेरा लेन्सची आवश्यकता असते. आणि या सगळ्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे, अशा प्रकारच्या गुंतवणुकीची तुमची तयार असायला हवी, असं ते म्हणाले.



भरपूर वेळ द्या!

सागर गोसावी सांगतात, वाईल्डलाईफ फोटोग्राफीसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. 'एखाद्या जिप्सीमध्ये बसून वाघांचे फोटो काढणं ही वेगळ्याच प्रकारची फोटोग्राफी आहे. पण खरोखर तुम्हाला वाईल्डलाईफ फोटोग्राफी करायची असेल, तर तुम्हाला बाहेर पडावं लागेल, फिरावं लागेल, वेगवेगळी ठिकाणं पाहावी लागतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे फोटो काढावे लागतील'.

मी फोटोग्राफी सुरु केली, तेव्हा अशा प्रकारचे वर्कशॉप नव्हते. मी स्वत:च शिकलो. मला वाटतं, आपण स्वत: काढलेले फोटो आपल्याला खूप शिकवतात. त्यामुळे स्वत:ला वेळ द्या.

सागर गोसावी, वाईल्डलाईफ फोटोग्राफर

मुलाखतीचा शेवट करताना सागर गोसावींनी एक खूप महत्त्वाचा सल्ला सर्व इच्छुक फोटोग्राफर्सला दिला आहे. ते म्हणतात, "वाईल्डलाईफ फोटोग्राफी कठीण आहे, पण अशक्य नाही. पण जसं मी म्हणालो, यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गुतवणूक करावी लागते. त्यामुळे, या क्षेत्रात येताना एकदा नाही दहादा विचार करून मगच निर्णय घ्या. कारण इथे तुम्हाला अनेक गोष्टी 'अॅडजस्ट' कराव्या लागतील!"



तुम्ही त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांनी काढलेले फोटो पाहू शकता:

https://www.instagram.com/sagargosavi.photography/?hl=en

किंवा त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता:

https://www.sgpventures.in

हेही वाचा

'वर्ल्ड फोटोग्राफी डे' विशेष : मुंबईची क्षणचित्रे टिपणारे अवलिया


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा