राज्यात आणि केंद्रात शिवसेना-भाजपा एकत्र नांदत असले तरी गेल्या काही दिवसांपासून दोघांमधील कुरबुरी चांगल्याच वाढल्या आहेत. शिवसेनेनं तर भाजपाला अंगावर घेत लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढण्याचा राग दिला आहे. या रागानंतर अंगावर येणाऱ्या शिवसेनेला थेट शिंगावर घेणाऱ्या भाजपाने आता मात्र गोंजारायचं ठरवलं आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी पुढील निवडणूक शिवसेनेच्या सोबतीनेच लढवण्यात येतील, असं म्हणत या दाव्यावर जणू शिक्कामोर्तब केलं आहे.
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा याचं महामेळाव्यातील भाषण असो वा त्यानंतरची पत्रकार परिषद असो, शहा यांनी शिवसेनाला सोबत घेऊनच २०१९ च्या निवडणूक लढवली जाईल, असं म्हणत शिवसेनेसमोर पुन्हा युतीचा हात पुढं केला आहे. त्यामुळे शिवसेना या मैत्रीच्या हातावर टाळी देते का? याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.
राज्यात शिवसेनेला बाजूला सारून निवडणूका लढणं सध्या तरी भाजपाला परवडणारं नाही. त्यामुळेच एकीकडे सेना स्वबळाचा नारा देत असताना: दुसरीकडे भाजपा मात्र सेनेचं मन वळताना दिसत आहे. या धर्तीवर महामेळाव्यात सेनेला टार्गेट केलं जाणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत होती आणि ही शक्यता खरी ठरली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला टार्गेट न करता शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं तोंडभरून कौतुक केलं. तर शहा यांनी शिवसेनेला बरोबर घेऊनच २०१९ च्या निवडणूका लढवू आणि जिंकू, असा विश्वास व्यक्त केला.
सोबतच अमित शहा यांनी २०१९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याचा विचार नसल्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा-
भाजपा महामेळाव्यात मुंडे समर्थकांचा महागोंधळ
पश्चिम द्रूतगती महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी