गेल्या तीन-साडे तीन वर्षांत भाजपा सरकारनं इतकं पारदर्शकपणे काम केलं की विरोधकांना आरोप करायला काहीही सापडलं नाही. तेव्हा नाईलाजाने त्यांना उंदरांच्या गोळ्या आणि चहा काढावा लागला. पवारसाहेब म्हणाले, आमच्या काळात एवढा चहा कुणी पित नव्हतं. पवारसाहेबांना माझं एवढंच सांगणं आहे की, आमचा चहा काढू नका आणि चहावाल्याच्या नादी लागू नका. कारण चहावाल्याच्या नादी लागल्यावर काय होतं ते २०१४ मध्ये सर्वांनी पाहिलं आहे. पुन्हा आमच्या नादी लागाल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवू, असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच चहा घोटाळ्यावरून टीका करणाऱ्या विरोधकांना उत्तर दिलं.
बीकेसी इथं आयोजित भाजपाच्या महामेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसवर जोरदार टीका केली. २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला दुखावणं भाजपाला परवडणारं नाही याची जाणीव असल्याने मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर कोणतंही भाष्य न करता बाळासाहेब ठाकरे यांचं गुनगाण केलं.
सध्या राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. या हल्लाबोलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपच्या ४ वर्षांतील भ्रष्टाचाराची पोलखोल केली जात आहे. मात्र राष्ट्रवादीचं हे हल्लाबोल आंदोलन नसून डल्लाबोल आंदोलन असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. ज्यांनी राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारला तेच हल्लाबोल करत असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
राज्यात नव्हे, तर देशभर भाजपाचं सरकार असून २०१९ मधील निवडणुकांची भीती विरोधकांमध्ये आहे. त्यांची दुकानदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये बंद केली. त्यामुळे बेरोजगार झालेले लांडगे एकत्र येऊन भाजपासारख्या सिंहाशी लढण्याचा प्रयत्न करताहेत. पण या सिंहाच्या पार्टीसमोर हे लांडगे टिकणार नाहीत. त्यामुळेच सत्तेसाठी या लांडग्यांकडून येत्या काळात दंगली घडवल्या जातील, असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
हेही वाचा-
३८ वर्षांची झाली भाजपा, बीकेसीत जाेरदार शक्तीप्रदर्शन
भाजपा महामेळाव्यात मुंडे समर्थकांचा महागोंधळ
पश्चिम द्रूतगती महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी