गतिमंद नव्हे गतिशील!

  मुंबई  -  

  समाजात ज्यांच्याकडे करुण नजरेनं पाहिलं जातं किंवा बहुधा दुर्लक्षिलं जातं, अशा दिव्यांग (गतिमंद) व्यक्तींचं भवितव्य काय? या प्रश्नाचं उत्तर शोधताना त्यांच्याकडून 100 टक्के अचूक काम करवून घेण्याचा चमत्कार पुण्यातल्या सुभाष चुत्तर यांनी करून दाखवलाय.

  चाकण येथे 30 हजार स्क्वेअर फुटाच्या शेडमध्ये पसरलेला `असोसिएटेड मॅन्युफॅक्चरिंग` हा कारखाना सुभाष चुत्तर आणि त्यांचे सहकारी जैन यांनी सुरू केला. त्यात ऑटोमोबाईल प्रेस्ड कंपोनन्ट्स म्हणजे गाड्यांचे सुटे भाग बनवले जातात. जवळपास सव्वादोनशे कामगारांमध्ये 35 ते 38 जणांचा एक गट पटकन लक्षात येत नाही असाच आहे. ही मुलं दिव्यांग असून त्यातही बहुतेक गतिमंद आहेत. पण, त्यांचा कामाचा आवाका पाहिला तर आश्चर्यचकित व्हायला होतं.

  सुभाष चुत्तर यांचा मुलगा अजय हा गतिमंद आहे. पण, त्याच्या या व्यंगापेक्षा त्याच्यातील गुण शोधण्याच्या त्यांचा आणि त्यांच्या पत्नीच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांच्या स्वप्नांना एक नवी पालवीच फुटली. या गतिमंद व्यक्तींकडूनही उत्कृष्ट परफॉर्मन्स मिळू शकतो, हे त्यांनी अजयच्या उदाहरणातून सिद्ध केले.


  हा खेळ आकड्यांचा

  अजयला पाच अधिक तीन विचाराल तर पटकन् सांगता येत नाही. पण, कॉम्प्युटरवर कोणत्या फोल्डरमध्ये कोणती फाईल कधी आणि कुणी ठेवली आहे, हे मात्र तो तात्काळ सांगू शकतो. अगदी टेलिफोन नंबरपासून विविध तारखा आणि इतर संख्या त्याला तोंडपाठ असतात. आता ही दैवी देणगी म्हणा किंवा निसर्गाचा चमत्कार, पण हा ओळखला की अजयसारखं क्वालिटी मॅनेजर होणं जगातल्या कोणत्याच दिव्यांगाला अशक्य नाही, असं चुत्तर यांचं ठाम म्हणणं आहे.

  अजय जर इतकं चांगलं काम करू शकतो तर बाकीच्यांना का संधी द्यायची नाही, या विचारातून चुत्तरांनी सूर्यकांत नावाच्या आणखी एका मुलाला घडवण्यावर भर दिला. 25 वर्षांपूर्वी न्हाव्याच्या घरात सापडलेला हा सूर्यकांत केवळ स्वतःचाच संसार नव्हे तर म्हाताऱ्या आई-वडिलांचाही आधारवड बनलाय.

  सूर्यकांतपासून सुरू झालेलं हे चक्र अव्याहतपणं सुरू आहे. आजही या कारखान्यात 35 ते 38 दिव्यांग इतरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि इतरांपेक्षा कांकणभर चांगलाच परफॉर्मन्स दाखवत आहेत.


  जगाने घेतली दखल

  चाकणच्या या कारखान्यातील या संपूर्ण घटनाक्रमाची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली असून व्ही-डब्ल्यू (व्होल्क्स वॅगन) या कंपनीनेही गतिमंदांसाठी विशेष कक्ष स्थापन करून त्यांनाही नोकरीत सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू केला आहे.


  गतिमंदांनाही काम द्या!

  सुभाष चुत्तरांनी निवृत्तीनंतरही गतिमंद मुलांसाठी काम करणे अव्याहतपणे सुरू ठेवलं असून प्रत्येक उद्योजकाने आपल्या कंपनीत किमान एका गतिमंदाला तरी रोजगार दिल्यास गतिमंदांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेची किरणं उगवण्यास नक्कीच वेळ लागणार नाही, असं ते आवर्जून सांगतात.


  व्हिडिओग्राफर - विनीत पेडणेकर  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.