सीएसटीएमचे दोन दरवाजे होणार बंद!

  CST
  सीएसटीएमचे दोन दरवाजे होणार बंद!
  मुंबई  -  

  दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात गर्दीच्या वेळेत शिरताना आणि बाहेर पडताना प्रवाशांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागते. सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत गर्दीचा लोंढा एवढा मोठा असतो की मुसंडी मारून शिरकाव केल्याशिवाय आत किंवा बाहेर पडताच येत नाही. आहेत ते दरवाजेही अपुरे पडतात. त्यातच आता मध्य रेल्वे प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन अनावश्यक प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची वास्तू

  ऐतिहासिक वास्तू असलेली टर्मिनसची इमारत कायदा, सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नेहमीच संवेदनशील मानली जाते. समाजविघातक काम करणाऱ्या प्रवृत्तींच्या हिटलिस्टवर 'सीएसटीएम'चे नाव नेहमीच पहिल्या स्थानी असते. 26/11 चा दहशतवादी हल्ला कुणी कसा विसरू शकेल? त्यामुळेच येथे तैनात रेल्वे पोलिस, आरपीएफ आणि जीआरपी यांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो. परंतु गर्दीच्या वेळेत त्यांनाही प्रत्येक संशयास्पद प्रवाशावर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळेच अनावश्यक प्रवेशद्वारांचा आढावा घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील टाइम्स इमारतीसमोरील एक प्रवेशद्वार आणि पार्सल डिपार्टमेंटकडील एक प्रवेशद्वार असे दोन प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


  सीएसटीएमचे 12 प्रवेशद्वार

  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये एकूण 12 ठिकाणांहून प्रवाशांना स्थानकात प्रवेश करता येतो. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्वच प्रवेशद्वार महत्त्वाचे आहेत. पण प्लॅटफॉर्म क्र.1 येथील टाइम्स इमारतीच्या दिशेकडील प्रवेशद्वार आणि लांबपल्ल्याच्या गाड्या सुटणाऱ्या पार्सल डिपार्टमेंटकडील प्रवेशद्वाराचा फारसा वापर होत नसल्याने येत्या काही दिवसांत हे दोन्ही प्रवेशद्वार बंद करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


  सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावरच

  26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर ‘सीएसटीएम’मधील कमकुवत सुरक्षा व्यवस्थेचा अनुभव मुंबईकरांना आला होता. त्यानंतर इथली सुरक्षा व्यवस्था भक्कम करण्यासाठी नव्याने घडी बसविण्यात आली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह कमांडोचा पर्यायही येथे अवलंबण्यात आला. तरीही स्थानकातील सुरक्षा व्यवस्था चोख होऊ शकलेली नाही.


  सीएसटी स्थानकातील असुरक्षित प्रवेशद्वारांचा प्रश्न तसाच आहे. स्थानकांमधील जादा प्रवेश मार्गिका बंद करण्यापूर्वी आढावा घेण्यात येणार आहे. अन्यथा गर्दीच्या वेळेत स्थानकात प्रवाशांची कोंडीही होऊ शकते. त्यामुळे योग्य अभ्यासानंतरच प्रवेशद्वार बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
  - सचिन भालोदे, वरिष्ठ सुरक्षा आयुक्त, आरपीएफ, मध्य रेल्वे  हेही वाचा - 

  सीएसटी परिसरातील सबवेच्या छताचे रुप पालटणार

  सीएसटी परिसरात पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त  डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

  मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

  (खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.