Advertisement

खवय्ये असाल तर एका बैठकीत ही थाळी संपवून दाखवा!

मुंबईत थाळी हा प्रकार जुना आहे. आजही काही रेस्टॉरंटनी थाळी पद्धत जपली आहे. भारतीय पारंपरिक चवीचा खाद्यानंद देणारे हे रेस्टॉरंट्स आता नव्या रुपात येत आहेत. चाटपासून ते मिठाईपर्यंत जेवणाची शाकाहारी मेजवानी पुरवणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यावर तृप्तीचा ढेकर आल्याशिवाय राहणार नाही!

खवय्ये असाल तर एका बैठकीत ही थाळी संपवून दाखवा!
SHARES

पूर्ण भरलेली थाळी...त्यात ७ ते ८ प्रकारच्या भाज्या...३ ते ४ गोड पदार्थ...एक डिश भरून साधा भात आणि पुलाव, डाळीचे एक ना अनेक प्रकार, छास, लोणचं, पापड आणि बरंच काही...लिस्ट खूप मोठी आहे...इतके पदार्थ पाहून कदाचित तुम्हाला कळणार नाही की सुरुवात करायची तरी कुठून? असं राजभोग जेवण तर राजा-महाराजांच्या काळात असायचं. पण बदलत्या खाद्यसंस्कृतीची मेहेरबानी म्हणा असं साग्रसंगीत जेवण तुम्हाला मुंबईसारख्या शहरात चाखता येत आहे.


मुंबईत थाळी हा प्रकार जुना आहे. आजही काही रेस्टॉरंटनी थाळी पद्धत जपली आहे. भारतीय पारंपरिक चवीचा खाद्यानंद देणारे हे रेस्टॉरंट्स आता नव्या रुपात येत आहेत. चाटपासून ते मिठाईपर्यंत जेवणाची शाकाहारी मेजवानी पुरवणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये जेवल्यावर तृप्तीचा ढेकर आल्याशिवाय राहणार नाही. असेच काही रेस्टॉरंट आणि तिथल्या स्पेशल थाळी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


१) महाराजा भोग थाळी

महाराजा भोग या शाकाहारी हॉटेलमध्ये तुम्ही विविध प्रकारच्या थाळींचा मनसोक्त आनंद घेऊ शकता. गुजराती आणि राजस्थानी थाळी ही या हॉटेलची खासियत आहे. राजस्थान-गुजराती पद्धतीच्या थाळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात तुम्हाला शाकाहारी पदार्थांचं भरपूर वैविध्य चाखायला मिळतं. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या थीमनुसार थाळीचे प्रकार उपलब्ध केले जातात.



पण यात एक ट्विस्ट म्हणजे इथेच तुमच्या टेबलाच्या आकाराची थाळी देखील उपलब्ध आहे. तुमच्या फॅमिलीमधले चार ते सहा जण ही थाळी आरामात संपवू शकतात.



मुंबईत बोरीवली, मालाड, गोरेगाव, लोअर परेल, खार अशा अनेक ठिकाणी राजभोग हॉटेलच्या शाखा आहेत. एका प्रिमियम थाळीसाठी ४०० ते ५०० रुपये आकारले जातात. फॅमिली थाळीसाठी अदिक रुपये आकारले जातात.


२) दारा सिंग थाळी

दारा सिंग थाळी...नाव वाचून भारी वाटतं ना? फक्त नावच नाही, तर नावाप्रमाणेच ही थाळी देखील जबरदस्त आहे. दारा सिंग थाळीत चटपटीत पाणीपुरीसोबत तब्बल ३६ निरनिराळ्या पदार्थांची चव चाखता येते. ८-९ प्रकारच्या भाज्या, डाळीचे ३-४ प्रकार, पकोडे, भज्या, चपाती, रोटी, गुलाबजाम, बासूंदी, जिलेभी आणि असं बरंच काही. एक व्यक्ती ही पूर्ण थाळी संपवणं अशक्यच आहे!



आत्तापर्यंत एवढी मोठी थाळी कुणी लाँच नसेल केली. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारात ही थाळी उपलब्ध आहे. पवई आणि ठाणे इथल्या मिनी पंजाब या हॉटेलमध्ये तुम्ही या थाळीचा आनंद घेऊ शकता. व्हेज थाळीसाठी तुम्हाला ९९९ रुपये तर नॉनव्हेज थाळीसाठी १२९९ रुपये मोजावे लागतील.



हेही वाचा : मिल्कशेकचे दिवस गेले आता! फ्रीकशेक ट्राय केलंत का?


 

३) चॉकलेट थाळी

चॉकलेट प्रेमींनो अब दिल थाम के बैठो...कारण तुमच्या समोर सादर करत आहोत चॉकलेट थाळी... लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खूप आवडतं. सर्वांच्या आवडीचं चॉकलेट आता थाळीच्या स्वरूपात सादर करण्यात आलं आहे. या थाळीत चॉकलेटपासून बनवलेले नानाविध पदार्थ तुम्हाला चाखता येणार आहेत.



चॉकलेट सूप, चॉकलेट श्रीखंड, चॉकलेट टफल, लॉलिपॉप, चॉकलेट खाकरा आणि चॉकलेट गुलाबजाम, चॉकलेट आईस्क्रीम असे चॉकलेटचे वेगवेगळे पदार्थ थाळीत दिले जातात. तुमच्या तोंडाला सुटलं की नाही पाणी? मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह परिसरातल्या देशी क्लब इथं या थाळीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. या थाळीसाठी तुम्हाला ४१५ रुपये मोजावे लागतील.


४) गोल्डन स्टार थाळी

राजस्थानी-गुजराती पद्धतीची थाळी सर्व्ह करणारी गोल्डन स्टार थाळी ही चर्नी रोडची खासियत आहे. इथल्या थाळीत इतके पदार्थ खायला मिळतात की, अन्न हे पूर्णबह्म असल्याची प्रचितीच येते!



या थाळीत रोटी, भाज्या, भात, फरसाण, गोड पदार्थ, चटण्या, लोणची, सॅलड, ताक असे तब्बल पंचवीस ते तीस पदार्थ असतात. स्टार्टर्समध्ये मुगाची भजी, ढोकळा आणि मटार, भाज्यांचे सारण असलेला गुगरा असतो. मुख्य जेवणात गव्हाची, बाजरीची आणि ठेपला अशा तीन प्रकारच्या रोटी आणि भाकऱ्या असतात. सोबत तीन भाज्या, हिरवी भाजी, एक बटाट्याची भाजी आणि एक राजस्थानी भाजी असते. राजस्थानी दाल-बाटी हा या थाळीतील आणखी एक पदार्थ. डाळ आणि गोड आणि तिखट अशा दोन प्रकारच्या कढी असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि रंगाच्या चटण्या, ताक असतं. गोड म्हणून दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, शुद्ध तुपातली मिठाई असं साग्रसंगीत जेवण असतं.

विशेष म्हणजे इथला मेन्यू रोज बदलतो. एवढंच नव्हे, तर सकाळी आणि रात्री वेगवेगळा मेन्यू असतो. हे सगळं अनलिमिटेड म्हणजे तुम्ही पाहिजे तितकं खाऊ शकता. या थाळीची किंमत ३५० रुपये आहे.


५) बोहेमिआन ब्रू थाळी

मुंबईतच्या खार इथल्या बोहेमिआन ब्रू या हॉटेलमध्ये तुम्ही युरोपिअन पदार्थांमधील थाळींचा आस्वाद घेऊ शकता. सौतीड व्हेजिटेबल, २ गार्लिक ब्रेड, फ्रेंच फ्राईस, पास्ता, रोसेटो, चॉकलेट ब्राऊनी या पदार्थांचा समावेश असतो. कॉन्टिनेंटल थाळी बनवणारं हे मुंबईतील एकमेव हॉटेल आहे.



तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं थाळी बनवून घेऊ शकता. व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. व्हेज थाळीसाठी ३९९ रुपये मोजावे लागतील. तर नॉनव्हेज थाळीसाठी ४९९ रूपये आकारले जातात.



हेही वाचा

नॉन-व्हेज, चॉकलेट आणि टेस्ट ट्यूब पाणीपुरी! चाखायची असेल तर इथे या!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा