Advertisement

...म्हणून मुंबई कधीच थांबत नाही!


...म्हणून मुंबई कधीच थांबत नाही!
SHARES

दहशतवादी हल्ला असो किंवा मग शहर तुंबवणारा पाऊस...मुंबई कधीही थांबलेली नाही...मुंबई कधीच थांबत नाही...कोणत्याही संकटात ‘मुंबईचं स्पिरीट’ दिसतं म्हणतात. ठामपणे उभं रहाण्याचं..निर्धारानं लढण्याचं...आणि जिद्दीनं पुढे जाण्याचं...पण मुंबईचं हे स्पिरीट नक्की आहे तरी काय? अशी कोणती गोष्ट आहे जी मुंबईला कायम चालतं, धावतं आणि अविरत सुरुच ठेवते? नोकरी तर सर्वच ठिकाणी लोकं करतात, पैसाही सगळीकडेच लोकं कमावतात...पण कोणत्याही मोठ्या धक्क्यातून सावरुन पुन्हा जिद्दीनं उभं राहणारी मुंबईच! मुंबईच्या या जिवंतपणाचं नक्की रहस्य काय आहे? अर्थात, हे जाणून घ्यायचं असेल, तर त्या मुंबईकरांनाच विचारायला हवं, जे मुंबईला पुन्हा उभं करतात...आम्हीही तेच केलं…


'आम्ही कुणाला उपाशी ठेऊ शकत नाही'

‘हे सर्व चाललंय ते पोटासाठीच ना?’ हे वाक्य तुम्हाला हमखास ऐकायला मिळत असेल. मुंबईकरांच्या त्याच पोटाशी थेट संबंध असणारे मुंबईचे डबेवाले. आजघडीला मुंबईत तब्बल 5 हजार डब्बेवाले दिवसाला 2 लाख डबे पोहोच करतात. मुंबईकराला उभं रहायला आणि मेहनत करायला ताकद देणारा मुंबईचा डबेवाला...गेल्या 15 वर्षांपासून मुंबईत डबे पोहोचवण्याचं काम करणारे अर्जुन सावंत त्यातलेच एक. 26 जुलै 2005चा पाऊस, 2008चा मुंबई हल्ला आणि 2011चे मुंबईतील बॉम्बस्फोट यांचे साक्षीदार..आणि तेव्हाही न थांबता डबे पोहोचवण्यासाठी घराबाहेर पडलेले...

आमच्यामुळे कुणी उपाशी राहिलंय असं कधीच घडायला नको. आम्ही कुणाला उपाशी ठेऊ शकत नाही. त्यामुळे काहीही झालं, तरी घराबाहेर पडतोच पडतो. शिवाय अन्न पुरवणं ही सर्वात चांगली सेवा आहे, तुफान पाऊस होऊन रेल्वे बंद पडली, तरी आम्हाला फरक पडत नाही. कारण, हाताशी सायकल आहे आणि डब्बेवाल्यांचं अर्ध्यापेक्षा जास्त काम हे सायकलवरच होतं. मुंबईचं म्हणाल, तर मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस पोटासाठी बाहेर पडत असतो. त्यामुळे दुसरी कोणतीही गोष्ट त्याला अडवू शकत नाही.

अर्जुन सावंत, डबेवाले, गिरगाव


'मुंबई हे स्वप्नांंचं शहर'

मुंबईची लोकल ही मुंबईची जीवनवाहिनी असेल, तर मुंबईतल्या टॅक्सी या त्या वाहिनीतल्या रक्तपेशी आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हात दाखवा, टॅक्सी थांबवा अशा सोयीमुळे मुंबईकरांसाठी शहरातला प्रवास कधीच जिकिरीचा होत नाही. जवळपास 50 वर्षांपासून दादरमध्ये रहाणारे आणि गेल्या काही वर्षांपासून मुंबईत टॅक्सी चालवणारे वैभव सावंत ‘मुंबई’ नावाचं स्वप्न उराशी बाळगून आहेत. आणि त्या स्वप्नालाच जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. घरची परिस्थिती बेतास बेत असली, तरी लाखो मुंबईकरांप्रमाणेच त्यांचंही एक स्वप्न आहे.

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. इथे प्रत्येकाची स्वप्नं असतात. मला स्वत:ला आयफोन घ्यायचाय. ही स्वप्नंच मुंबईकरांना घरात थांबू देत नाहीत. मग काहीही झालं, तरी मुंबईकर घराबाहेर पडतोच. कधी इच्छेने, तर कधी नाईलाजाने. शिवाय कुटुंबाची जबाबदारी, सतत वाढणाऱ्या गरजा आणि वाढता खर्च बघता, मुंबईकर घरात थांबणं शक्यच नाही. माझ्या 6 टॅक्सी आहेत. पण तरीही वाढता खर्च आवरत नाही. तो भागवायचा असेल, तर घराबाहेर पडावंच लागेल.

वैभव सावंत, टॅक्सी ड्रायव्हर


'इथलं वातावरण मॅजिकल असतं'

दादरमध्ये रहाणाऱ्या आणि तिथेच मेस चालवणाऱ्या संदीप वैद्य यांना मुंबई एक मॅजिक वाटते. कधीच न झोपणाऱ्या मुंबईचं त्यांना अप्रूपही वाटतं आणि अभिमानही!

मुंबईतलं वातावरण एकदम मॅजिकल असतं. एक तर मुंबई कधीच झोपत नाही. शिवाय कोणतंही संकट आलं तरी मुंबईतर एकमेकांना मदत करतात. मग ते हिंदू असोत की मुस्लिम. पोलिस, पालिका अधिकारी या लोकांमुळे मुंबईकरांना सेफ वाटतं. बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं, तेव्हा या भागात सगळं बंद होतं. तेव्हा आम्हीसुद्धा पालिकेच्या जी नॉर्थ विभागात कर्मचाऱ्यांसाठी जेवणाचे डबे नेऊन दिले होते.

संदीप वैद्य, मालक, सिद्धिविनायक पोळी-भाजी केंद्र


'हे मुंबईकरांचं धैर्य'

कोणत्याही दुर्घटनेमध्ये डॉक्टरांची भूमिका ही अतिशय महत्त्वाची ठरते. रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार मिळणं ही सर्वात महत्त्वाची बाब असते. आणि डॉक्टरांशिवाय ही गोष्ट निव्वळ अशक्य आहे. डॉक्टरांना मात्र मुंबईकरांचं धैर्य मोलाचं वाटतं...

सेवा द्यायची आहे तर द्यायची आहे. डॉक्टरकीचा पेशाच असा असतो, की ज्यामध्ये पेशंटला सेवा देणं ही प्रायॉरिटी असते. मग त्यामध्ये स्वत:च्या जिवाला कितीही धोका असला, तरीही सेवा करणं हे महत्त्वाचं असतं. अशा परिस्थितीमध्ये मुंबईकरांचं धैर्य फार महत्त्वाची भूमिका बजावतं. ती एकच गोष्ट आहे, जी या मुंबईला पुन्हा उभी करते.

डॉ. राजेश कतरे, अध्यक्ष, निवासी डॉक्टर संघटना, केईएम


'मुंबईकर कधीच हरणारा नाही'

मुंबईत आग लागण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तशा त्या वेळोवेळी घडतच असतात. मात्र अशा वेळी मुंबईकरांसाठी धावून येतात ते अग्निशमन विभागाचे जवान. मुंबईच्या अग्निशमन विभागात गेल्या 28 वर्षांपासून कार्यरत असलेले मुख्य अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांना मुंबईच्या जिद्दीवर प्रचंड विश्वास आहे. आणि त्यांच्या कामाबद्दलच्या कमिटमेंटवरही!

टु वर्क ब्रेन प्रॉपर्ली, अदर बॉडी ऑर्गन्स शुड अल्सो वर्क परफेक्टली. इफ मुंबई इज ब्रेन, देन वुई आर बॉडी ऑर्गन्स, एण्ड वुई हॅव टु वर्क परफेक्टली. फिनीश! कोणतीही आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तरी आम्ही त्यात सोल्युशन देणं जर अपेक्षित असेल, तर आम्ही सोल्युशन दिलंच पाहिजे. ते आमचं कामच आहे. अशा वेळी जर आम्ही आमच्या समस्या घेऊन बसलो, तर मुंबईकरांच्या समस्या कोण सोडवणार? 26 जुलैच्या पावसातही आम्हाला मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला. पण आम्ही आमचे रिसोर्स क्रिएट केले. आणि तसंही, कोणत्याही घटनेमुळे थकलो, हरलो असा उदासीन दृष्टीकोण मुंबईकरांमध्ये नाही. आलेल्या समस्येतून पुन्हा उभं रहायला हवं, असा विचार करणारा मुंबईकर आहे.

प्रभात रहांगदळे, मुख्य अग्निशमन अधिकारी


'मुंबईकर खंबीर आहे'

कोणतंही संकट म्हटलं की सुरक्षा ही आलीच. आणि सुरक्षा म्हटली की पोलिसही आलेच. मग पोलिसांना विसरुन कसं चालेल? शेवटी 60च्या दशकात मुंबईत जन्मलेल्या गँगवॉरपासून ते गेल्या काही वर्षांत मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांपर्यंत...अशा सर्वांपासूनच मुंबई पोलिस मुंबईच्या रक्षणासाठी कायम तयार असतात. सुमारे 2 लाखांच्या आसपास असणाऱ्या मुंबई पोलिसांचा मुंबईला पुन्हा उभं करण्यात नक्कीच सिंहाचा वाटा असतो.

मुंबईकर खंबीर आहे. आत्तापर्यंत मुंबईवर अशी अनेक संकटं आली. पण त्या प्रत्येक संकटात मुंबईकर खंबीरपणे उभा राहिलाय. आणि मुंबईकरांचं रक्षण करत कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे मुंबई पोलिसांचं आद्य कर्तव्य आहे. मुंबईकरांची सुरक्षा ही पोलिसांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे काहीही झालं, तरी पोलिस रस्त्यावर उतरणारच!

अजित शिंदे, पोलीस नाईक, माटुंगा


'जे नशीबात आहे ते होणारच'

या सगळ्यांनंतर सर्वात शेवटी जो येतो तो म्हणजे सामान्य मुंबईकर! रोज सकाळी उठून हातात डबा घेणारा, शेअर रिक्षाने स्टेशनला पोहोचणारा, रेल्वेत धक्केधपाटे खात कामावर जाणारा आणि संध्याकाळी जिवावर आलेला परतीचा प्रवास करत घरी येणारा...जो कामावर जातो त्याच्या कुटुंबाच्या काळजीने...आणि त्याचं कुटुंब दिवसभर चिंतेत असतं त्याच्या काळजीने! पण कदाचित हा सामान्य मुंबईकर बेडर झालाय...प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी...

जे नशीबात आहे ते होणारच. उगीच त्याच्या भीतीमुळे घरात का बसून रहायचं? शिवाय रोजीरोटीसाठी घराबाहेर पडावंच लागतं. घरात कधीपर्यंत बसून रहाणार? आणि मुंबईकरांना हाच विचार सवयीचा आहे. कमवायचं असेल, तर घराबाहेर पडावंच लागेल.

संतोष निर्मल, सामान्य मुंबईकर

डबेवाले अर्जुन सावंत यांची मुंबई पोटावर चालते...तर टॅक्सीवाले वैभव सावंत यांची मुंबई स्वप्नाळू आहे...मेसवाल्या संदीप वैद्यांची मुंबई मॅजिकल आहे...पोलिस नाईक अजित शिंदेंची मुंबई खंबीर आहे..तर फायरब्रिगेडच्या रहांगदळेंची मुंबई जिद्दी आहे...या प्रत्येकासाठी मुंबई वेगळी आहे, तिची स्वतंत्र वृत्ती आहे, स्वतंत्र ओळख आहे, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे...पण या सगळ्यांशी बोलताना एक बाब मात्र सारखीच वाटली...या सगळ्यांची मुंबई एकाच गोष्टीसाठी पुन्हा उभी रहाते..उद्यासाठी...एवढी एक गोष्ट कदाचित मुंबईला पुन्हा उभी करायला आणि घराबाहेर पडायला पुरेशी ठरते...कदाचित हेच मुंबईचं खरं स्पिरीट असावं...जे प्रत्येक मुंबईकरामध्ये ठासून भरलंय...मुंबईच्या या स्पिरीटला सलाम!



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा