Advertisement

'पीव्हीआर'ला मनसेच्या 'रिअॅलिटी चेक'चा दणका!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लोअर परळच्या पीव्हीआर मल्टिप्लेक्सवर हल्लाबोल करत तिथं सोमवारी दुपारी रिअॅलिटी चेक केला. यावेळी तिथं वाढीव दरानुसार खाद्यपदार्थ विकण्यात येत असल्याचं लक्षात आल्यावर मल्टिप्लेक्स मालकाविरोधात त्वरीत कारवाई करण्याची विनंती मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली.

'पीव्हीआर'ला मनसेच्या 'रिअॅलिटी चेक'चा दणका!
SHARES

सिनेमागृहांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास प्रेक्षकांना मज्जाव न करण्याचे त्याचसोबत आतील खाद्यपदार्थांचे दर 'एमआरपी'नुसार आकारण्याचे आदेश राज्य सरकारने राज्यभरातील सिनेमागृह मालकांना दिले आहेत. तरीही बरेचसे सिनेमागृह या आदेशाचं पालन करत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लोअर परळच्या पीव्हीआर मल्टिप्लेक्सवर हल्लाबोल करत तिथं सोमवारी दुपारी रिअॅलिटी चेक केला. यावेळी तिथं वाढीव दरानुसार खाद्यपदार्थ विकण्यात येत असल्याचं लक्षात आल्यावर मल्टिप्लेक्स मालकाविरोधात त्वरीत कारवाई करण्याची विनंती मनसे कार्यकर्त्यांनी पोलिसांना केली. तसंच पोलिसांनी कारवाई न केल्यास मनसे स्टाइल आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला.


बघा, काय झालं?



मल्टिप्लेक्सविरोधात मनसे मैदानात

मल्टिप्लेक्स मालक सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहेत की नाही, या संदर्भात सध्या मनसे कार्यकर्ते राज्यभरात ठिकठिकाणी जाऊन रियालिटी चेक करत आहेत. त्यानुसार संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्ते सोमवारी दुपारी लोअर परळच्या फिनिक्स कंपाऊंडमधील पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये सिनेमा बघण्यासाठी गेले.


नियमांचं उल्लंघन

यावेळी कार्यकर्त्यांनी बाहेरून आणलेले खाद्यपदार्थ आत घेऊन जाण्यास सिनेमागृहाच्या व्यवस्थापनाने मज्जाव केला. यामुळे कार्यकर्ते भडकले. तसंच काही कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समधील स्टाॅलवर विकत घेतलेले खाद्यपदार्थही 'एमआरपी'पेक्षा जास्त दराने विकण्यात येत असल्याचं दिसून आलं. याचा जाब विचारल्यास कार्यकर्ते आणि मल्टिप्‍लेक्‍स व्‍यवस्‍थापकामध्‍ये बाचाबाची झाली.



गुन्हा दाखल करण्याची मागणी

मात्र, पोलिसांनी वेळीच घटनास्‍थळी धाव घेत कार्यकर्त्‍यांची समजूत घालण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी कार्यकर्त्‍यांची पोलिसांसोबतही बाचाबाची झाली. कार्यकर्त्‍यांनी पीव्‍हीआर मालक व व्‍यवस्‍थापकाविरोधात गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी केली. तसं न झाल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याचा इशाराही दिला.


मल्टिप्‍लेक्‍सकडून सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नसताना पोलिसही मल्टिप्‍लेक्‍स व्यवस्थापनाची बाजू घेत आहेत. याचा अर्थ काय? पोलिस सरकारचे की चित्रपट मालकांचे? मल्टिप्लेक्सवाल्यांचं म्हणणं बरोबर असेल, तर गिरीश बापटांनी विधीमंडळात दिलेली माहिती खोटी होती का? मंत्र्यांचा आदेशही मल्टिप्‍लेक्‍स मालक पाळत नसतील, तर मंत्र्यांचं आपल्‍या कार्यक्षेत्रावर कोणतंच वर्चस्‍व नाही हेच सिद्ध होतं. बाहेरचे खाद्यपदार्थ आत घेऊन जाताना आम्हाला अडवण्यात आलं. त्यामुळे संबंधित पीव्हीआर मल्टिप्‍लेक्‍स मालक आणि व्‍यवस्‍थापकाविरोधात पोलिसांनी त्वरीत गुन्‍हा दाखल करावा. तसं नाही झालं तर आम्हाला मनसे स्टाइल आंदोलन करावं लागेल.
- संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे


काय म्हणाले होते बापट?

प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ सिनेमागृहात घेऊन जाण्यास मल्टिप्लेक्सचालक अडवू शकत नाहीत. असं करणाऱ्या मल्टिप्लेक्सवाल्यांविरोधात कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी विधीमंडळात दिला होता. या आदेशाचं पालन १ ऑगस्‍टपासून राज्‍यभरात करण्यात येईल, असंही बापट म्हणाले होते.


हेही वाचा-

मल्टिप्लेक्स मालकांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मनसेच्या मारहाणीविरोधात पोलिसांत जा, हायकोर्टाने मल्टिप्लेक्सवाल्यांना सुनावलं

मल्टिप्लेक्समध्ये ५ रुपयांचं पॉपकॉर्न २५० रुपयांत का?, न्यायालयानं सरकारला झापलं



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा