Advertisement

मेट्रो कारशेडचे आरक्षण वगळून विकास आराखडा मंजूर


मेट्रो कारशेडचे आरक्षण वगळून विकास आराखडा मंजूर
SHARES

मुंबईचा प्रारूप विकास आराखडा 2034 अखेर महापालिका सभागृहात मंजूर झाला. या विकास आराखड्यात 262 सूचनांसह बदल सूचवत हा विकास आराखडा मंजूर करताना आरेतील मेट्रो कारशेडचे आरक्षण वगळण्यात आले. याबाबत शिवसेनेने मांडलेली उपसूचना सभागृहात मंजूर करण्यात आली. कारशेडचे हे आरक्षण कायम राहावे म्हणून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षांची मदत घेतली. पण काँग्रेस आणि मनसेच्या मदतीने शिवसेनेने कारशेडच्या आरक्षणाचा डाव उधळवून लावला.

मुंबईचा प्रारूप विकास आराखडा सभागृहात मांडण्यात आल्यानंतर सभागृहातील 108 नगरसेवकांनी या चर्चेत भाग घेत आपल्या विभागातील सूचना मांडल्या. त्यांनतर सोमवारी उत्तर रात्री 1.33 मिनिटांनी विकास आराखडा आणि विकास नियंत्रण नियमावलीला मंजुरी देण्यात आली. तत्पूर्वी सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी आरेतील मेट्रो कारशेडचे आरक्षण रद्द करावे अशी उपसूचना मांडली. ही उपसूचना मतास टाकली असता भाजपाचे मनोज कोटक आणि प्रभाकर शिंदे यांच्यासह अन्य सदस्यांनी पोलची मागणी केली. त्यावेळी घेतलेल्या पोलमध्ये आरक्षण काढून टाकण्याच्या बाजूने 117 तर आरक्षण ठेवण्याच्या बाजूने 81 असे मतदान झाले. काँग्रेसने शिवसेनेच्या बाजूने मतदान करून निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर सभागृहनेते यशवंत जाधव यांनी 262 बदलांच्या सूचनांची एकत्रित एक उपसूचना मांडली, ही उपसूचना एकमताने मंजूर करण्यात आली.


सपा, राष्ट्रवादीला भाजपाने आपल्याकडे ओढले

विकास आराखडा मंजूर करताना कारशेडचे आरक्षण रद्द करण्याची उपसूचना मांडण्यात आल्यानंतर भाजपाने त्याला विरोध दर्शवला, पण भाजपासोबत सपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसही त्यांच्यासोबत होते. पण या पक्षांचे प्रत्येकी दोनच सदस्य त्यावेळी सभागृहात होते. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी मदत मिळवूनही भाजपाला आरक्षण कायम ठेवण्यात अपयश आले. दरम्यान भाजपाचे मकरंद नार्वेकर, त्यांची वहिनी, गीता गवळींसह चार ते पाच सदस्य गैरहजर होते.


आदित्य ठाकरे पावणेचार तास तळ ठोकून

महापालिका सभागृहात विकास आराखड्यावर चर्चा सुरू असताना रात्री दहा वाजता युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचे आगमन झाले. त्यानंतर ते सभागृहात विकास आरखड्यावर सुरू असलेली चर्चा ऐकत होते. यावेळी त्यांनी प्रभाकर शिंदे, श्रद्धा जाधव, दिलीप लांडे, राखी जाधव, मनोज कोटक, सभागृहनेते यशवंत जाधव यांच्यासह आयुक्तांचे भाषण ऐकले. त्यानंतर कारशेड मुद्द्यावरून पोलचे मतदान पार पडल्यानंतर रात्री 1. 40 वाजता ते निघून गेले.


आरेत कारशेड ऐवजी गोशाळा बांधा

'आरेतील कारशेडला शिवसेनेचा विरोध आहे आणि राहणार, असे सांगत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी या कारशेडच्या जागेवर गोशाळा बांधली जाईल, आम्ही तुमच्यासोबत राहू', असे सांगितले. पण हे यशवंत जाधव यांचे वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी सांगितले. परवडणारी घरे जर प्रथम कोणाला द्यायची झाल्यास ती गिरणी कामगारांना दिली जावी, असे सांगतानाच त्यांनी परवडणाऱ्या घरांच्या किमती जाहीर कराव्यात असे प्रशासनाला सांगितले. पुरातन वस्तूंचा आणि ठिकाणांचा तसेच धार्मिक स्थळांचा समावेश नसल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणली. 'किसी को नासिहत देते वक्त खुद खुशबू लेना मत भूल जाना' अशाप्रकारे शेरो-शयरीने जाधव यांनी भाषणाला सुरुवात केली. प्रत्येक विषयांवर शेरो-शायरी करत कधी भाजपाला तर, कधी प्रशासनाचा समाचार घेतला.

मेट्रो रेल्वे प्रकल्प मुंबईच्या दृष्टीने महत्त्वाचा असून पक्षीय मतभेद विसरून कारशेडचे आरक्षण कायम ठेवावे, अशी विनंती भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी केली. मेट्रो हा सरकारी प्रकल्प आहे. रिलायन्सच्या मेट्रोला 1 रुपया दराने भूखंड दिला जातो. पण या प्रकल्पाला भूखंड देण्यास विरोध होतो. खऱ्या अर्थाने या प्रकल्पाला जागा देऊन ऋण फेडण्याची गरज आहे. आज 262 सूचनांच्या प्रस्तावावर एकमत होते आणि कारशेडच्या मुद्द्यावरून होत नाही. याबाबद्दल भावी पिढी आपल्याला जाब विचारेल, असा भावनिक इशाराही त्यांनी दिला.

मुंबईत जी 10 लाख घरे बांधली जाणार आहेत, ती बांधकाम खर्चावर द्यावी तसेच लॉटरी पद्धतीने याची सोडत काढून त्यांची विक्री केली जावी. पण ही घरे देताना ती व्यक्ती मुंबई महाराष्ट्रात 15 वर्षांपासून राहणारा असावा, अशी सूचना त्यांनी मांडली. 1991च्या विकास आराखड्यात त्रुटी होत्या, पण या आराखड्यात झोपडपट्ट्यांच्या विकासाला गती दिली आहे. त्यामुळे झोपडीधारकांना दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.


भाग्य नव्हे दुर्भाग्य

हा विकास आराखडा मंजूर करण्याची संधी मिळते, म्हणून अनेकजण भाग्यवान समजतात, हे भाग्य नव्हे तर, दुर्भाग्य असल्याची खंत भाजपाचे प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली. विद्यमान विकास आराखड्याची केवळ 17 टक्केच अंमलबाजवणी होऊ शकली. अंमलबाजवणी होणार नसेल तर, चर्चा काय करणार? असे सांगत या आराखड्याबाबत प्रशासन उदासीन असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण ना जागा संपादित करू शकलो ना अनधिकृत बांधकाम करू शकलो. त्यामुळेविकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी परिमंडळ निहाय कमिटी स्थापन करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.


'मुंबईचा विकास शिवसेनेमुळे'

'मुंबईचा जो विकास झाला आहे तो शिवसेनेमुळे, असे सांगत माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी त्यामुळेच जनतेने आमच्या पक्षला पाचव्यांदा निवडून दिले' असल्याचे सांगितले. 262 सूचनांसह हा आराखडा आपण मंजूर करत आहोत. पण आपल्या सूचना ग्राह्य धरून तसे बदल केले का याची खात्री या सभागृहातील प्रत्येक सदस्याला व्हावी, यासाठी शासनाकडे पाठवण्यापूर्वी ते पुन्हा सभागृहात मांडले जावेत, असे त्यांनी सांगितले.

मिठागरे वाचलीच गेली पाहिजे, असे सांगत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी मिठागराच्या जागा वाचल्याच पाहिजे, असे सांगितले. मात्र, जी परवडणारी घरे बांधली जाणार आहेत ती अत्यल्प आणि अल्प उतपन्न गटातील असावीत, अशी सूचना त्यांनी मांडली. तसेच मुंबईत भाड्याची घरे उभारण्याची मागणी त्यांनी केली. वृद्धाश्रम क्षेत्रफळाची मर्यादा कमी करावी, जेणेकरून वृद्धाश्रम बांधण्यासाठी लोक पुढे येतील, असे त्यांनी सांगितले.

माहुल हा भाग कमर्शियल हब म्हणून आरक्षित करण्यात यावे, असे सांगत नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी या भागात प्रदूषण असल्यामुळे कोणतेही निवासी बांधकाम करू नये, अशाप्रकारची सूचना त्यांनी केली. शिवसेनेचे दत्ता पोंगडे यांनी परळमध्ये रुग्णालय अधिक असल्यामुळे रुग्णालच्या नातेवाईकांना राहण्यास जागा उपलब्ध व्हावी, अशी सूचना केली. सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी पश्चिम किनारपट्टीचा भाग चांगला झाला, त्याप्रमाणेच पूर्व किनारपट्टीचा व्हावा, अशी मागणी केली.

गिरगावमधील जलतरण तलावाचे आरक्षण कायम राहावे, ते बदलेले जाऊ नये, अशी सूचना भाजपा नगरसेविका अनुराधा पोतदार यांनी केली. गायवाडीतील मंडईचे आरक्षण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.


हेही वाचा -

विकास आराखड्यावर ३०० नवीन सूचना, पण यादीच तयार नाही?

आता भाजपाच्या भात्यातील बाण सुटणार!


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा