अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू


SHARE

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्टपणे बहुमताचा कौल देऊनही मागील १८ दिवसांमध्ये सत्ता स्थापन होऊ शकली नाही. परिणामी संविधानाच्या कलम ३५६ अंतर्गत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची नामुश्की ओढावली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची ही तिसरी वेळ आहे. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मुदतीपूर्वीच सत्ता स्थापनेचा दावा करण्यास असमर्थता दर्शवल्याने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्राकडे राष्ट्रपती रावजवटीची शिफारस केली. या शिफारसीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर यासंदर्भातील अध्यादेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीसाठी पाठवण्यात आला. त्यावर राष्ट्रपतींनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास स्वाक्षरी करताच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

हेही वाचा- राज्यपालांनी पुरेसा वेळच दिला नाही, शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका

ही वेळ का आली ?

विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ आॅक्टोबरला लागला. या निवडणुकीत भाजपला १०५, तर शिवसेनेला ५६ जागांचा कौल जनतेने दिला. सत्ता स्थापनेसाठी १६१ जागांचं संख्याबळंही महायुतीकडे होतं. त्यामुळे विधानसभेत अत्यंत आरामात बहुमत (१४५) सिद्ध करून महायुती सरकार स्थापन करेल, असं म्हटलं जात होतं. परंतु अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदासह सत्तेतील निम्म्या वाट्यावरून दोन्ही पक्षांमध्ये बिनसलं. 

भाजप-शिवसेनेत बिनसलं

भाजपने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास ठाम नकार दिल्यावर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू केल्या. सुरूवातीला राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला शनिवारी सत्ता स्थापनेचा दावा करण्याचं निमंत्रण देत ४८ तासांची मुदत दिली. परंतु पुरेसं संख्याबळ नसल्याचा हवाला देत भाजपने सत्ता स्थापन करण्यास नकार दिला. त्यानंतर राज्यपालांनी दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देऊन सोमवारी ८.३० वाजेपर्यंत २४ तासांची मुदत दिली. शिवसेनेने राज्यपालांकडे जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केला असला, तरी त्यांना दिलेल्या मुदतीत काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंब्याचं पत्रंच न दिल्याने शिवसेनेच्या हातून वेळ निसटली.

हेही वाचा- काँग्रेसचे आमदार नाराज, शरद पवारांचेही हात वर

सत्ता स्थापनेत अपयश 

त्यानंतर राज्यपालांनी तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देत मंगळवार सायंकाळी ७.३० वाजेपर्यंतची २४ तासांची मुदत दिली. परंतु राज्यपालांनी दिलेली मुदत संपण्याआधीच बहुमत सिद्ध करण्यास वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीने केल्याने राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्राकडे केली. त्याला राष्ट्रपतींनीही मंजुरी दिल्याने अखेर महाराष्ट्रातील तमाम जनतेला ज्याची भीती होती, तीच गोष्ट घडली.

बैठक सुरूच

दरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता स्थापनेबाबतची बोलणी अजून सुरू असून त्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला सहभागी करून घ्यायचं की नाही? मुख्यमंत्री कुणाचा राहील? कुणाला किती मंत्रीपदं मिळतील? तसंच सत्तेचं समान सूत्र काय असेल यावर चर्चा अपेक्षित आहे. या मुद्द्यांवर तिन्ही पक्षांचं एकमत झाल्यास तिन्ही पक्षांकडून पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा होऊ शकतो. परंतु तोपर्यंत राज्यात राष्ट्रपती राजवट कायम राहणार आहे.   हेही वाचा-
राज्यात याआधी 'ह्या' वेळी होती राष्ट्रपती राजवट

'आरेचा शाप' देवेंद्र फडणवीसांना भोवला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोलसंबंधित विषय
ताज्या बातम्या