Advertisement

दानवेंची जागा कोण घेणार?


दानवेंची जागा कोण घेणार?
SHARES

महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांच्यावर भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला विरोधी पक्षांनी जेरीस आणलं आहे. दुसरीकडे पक्षांतर्गत कुरबुरीसुद्धा वाढल्या आहेत. या परिस्थितीत सत्तेत टिकून राहण्याबरोबरच पक्षात बदल करण्याची तारेवरची कसरत भाजपाच्या धुरीणांना करावी लागत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच्या मुंबईभेटीत भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संघटनात्मक बदलांचे संकेत दिले होते. अमित शाह म्हणत असलेली ‘ती’ योग्य वेळ आता जवळ आली असल्याची मुंबई लाइव्ह सूत्रांची माहिती आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाचा खांदेपालट होण्याची शक्यता आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची जागा घेण्यासाठी विनोद तावडे, संभाजी निलंगेकर यांच्या नावांची चर्चा आहे.


दानवे का जाणार?

रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाला बॅकफूटवर जावं लागलं आहे. शिवाय त्यांची संघटनेवर पकडही दिसून येत नाही. अगदी अलीकडे लाखोंचं विजबील थकवल्याचे आरोप त्यांच्यावर झाले. प्रत्येक वेळी भाजपानं त्यांना सावरून घेतलं असलं तरी आता त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाविषयी लवकरच निर्णय घेणं गरजेचं असल्याची पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची भावना आहे, अशी माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘मुंबई लाइव्ह’ला दिली आहे. पण केंद्रात राज्यमंत्रीपद सोडून महाराष्ट्र भाजपाचं प्रदेशाध्यक्षपद स्वीकारणाऱ्या दानवे यांचं यथावकाश दिल्लीत पुनर्वसनही केलं जाऊ शकतं.



नवी विटी, नवं राज्य?

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडेसुद्धा सध्या विरोधकांच्या रडारवर आहेत. मुंबई विद्यापीठाचा गलथान कारभार, परिक्षांचे निकाल लावायला होणारा प्रचंड विलंब आदींसह आणखी काही बाबी तावडे यांच्या विरोधात आहेत. कधीकाळी मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असलेल्या जुन्या-जाणत्या तावडे यांना मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मोकळं करून त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा मुकुट घातला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तावडे मंत्रिमंडळातून बाहेर आल्यानंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलारयांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते, अशी भाजपातल्या सूत्रांची माहिती आहे.

प्रदेशाध्यक्षपदासाठी दावेदारी इथेच थांबत नाही. राज्याचे कौशल्य विकासमंत्री असलेले संभाजी पाटील निलंगेकर यांचं नावही चर्चेत आहे. दिवंगत विलासराव देशमुख यांच्या काळात काँग्रेसचा  गड समजल्या जाणाऱ्या लातूरमध्ये खिंडार पाडण्यात संभाजी पाटील निलंगेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निलंगेकर यांच्या संघटनकौशल्याचा भाजपाला 2019च्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. विशेष म्हणजे निलंगेकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतले मानले जातात. 



धोत्रे सरशी साधणार?

भाजपाचे अकोल्यातीस खासदार संजय धोत्रे यांच्या नावाचासुद्धा प्रदेशाध्यक्षपदासाठी विचार केला जात आहे. लागोपाठ तीनदा अकोल्यातून प्रतिस्पर्धी उमेदवारावर चढत्या बढतीने विजय मिळवणारे संजय धोत्रे हे उच्चशिक्षित, मृदु भाषी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पसंतीचे आहेत. अकोल्यात भाजपा वाढवण्यात धोत्रे यांचं मोठं योगदान आहे. थेट पंतप्रधान  पर्यायाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची  पसंती असल्यामुळे संजय धोत्रे यांचं पारडं सध्या जड मानलं जात आहे. याक्षणी तरी धोत्रे हे प्रदेशाध्यक्षाचे तगडे दावेदार आहेत. 




सरप्राइज एंट्री?

मुंबईतल्या ‘अतिभव्य मराठा क्रांती मूक मोर्चा’नंतर मराठा समाजाची मतं दुरावू नयेत, याची विशेष काळजी भाजपा घेणार आहे. मराठा समाजाच्या रावसाहेब दानवे यांना पर्याय ठरू शकेल असं मराठा नावच प्रदेशाध्यक्षपदासाठी भाजपाला पुढे आणायचं आहे.

या सर्व शक्यतांसोबत भाजपा प्रदेशाध्यक्षपदावर सरप्राइज एंट्री होऊ शकते. मंत्रिपदाचे दावेदार आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावर बढती मिळू शकते. दरम्यान, ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे हे लवकरच भाजपात येणार असून त्यांना भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवणार असल्याचीही कुजबूज पक्षात सुरू आहे. मात्र, पक्षात प्रवेश करणाऱ्या नव्या नेत्याला थेट राज्यात पक्षातील सर्वोच्च पद दिल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो, या विचारांच्या नेत्यांमुळे ही शक्यता कमी वाटते.




डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा